George Floyd च्या मृत्युनंतर अमेरिकेत उफाळला हिंसाचार; 40 शहरांमध्ये कर्फ्यू, लंडन, बर्लिन, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलियासह अनेक देशांमध्ये उमटले पडसाद
आजमितीस अमेरिकेत (United States of America) सर्वात जास्त कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. अशात अमेरिकेमध्ये एक नवा वाद उफाळून आल आहे, ज्याचे पडसाद इतरही देशांत उमटत आहेत.
सध्या संपूर्ण जग कोरोना व्हायरसशी (Coronavirus) लढत आहे. आजमितीस अमेरिकेत (United States of America) सर्वात जास्त कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. अशात अमेरिकेमध्ये एक नवा वाद उफाळून आल आहे, ज्याचे पडसाद इतरही देशांत उमटत आहेत. अमेरिकेमध्ये कृष्णवर्णीय (African-American) व्यक्ती जॉर्ज फ्लॉयडच्या (George Floyd) निधनानंतर देशात निषेधाची (Protests) आग पेटली आहे. सध्या परिस्थिती इतकी चिघळली आहे की, सरकारने वॉशिंग्टन डीसीसह (Washington DC) कमीत कमी 40 शहरांमध्ये कर्फ्यू (Curfew) लागू केला आहे. सीएनएनच्या वृत्तानुसार 40 शहरांमध्ये कर्फ्यू आणि 15 राज्ये व वॉशिंग्टन डीसीमध्ये सुमारे 5 हजार राष्ट्रीय गार्ड तैनात करण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त, आवश्यक असल्यास त्वरित परिस्थिती हाताळण्यासाठी बोलावले जाऊ शकतील असे 2000 गार्ड तयार ठेवण्यात आले आहेत.
शुक्रवारी रात्री व्हाईट हाऊसच्या बाहेर निदर्शक जमल्यानंतर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना, वॉशिंग्टन डीसीमधील भूमिगत बंकरमध्ये नेण्यात आले होते. व्हाईट हाऊसच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. ट्रम्प यांनी आरोप केला आहे की, जॉर्जसाठी सुरू केलेले आंदोलन हायजॅक केले गेले आहे आणि आता अशा लोकांना दहशतवादी घोषित करण्याचा निर्णय घेतला आहे. ट्रम्प यांनी ट्विट केले आहे की, अमेरिका अँटिफाला (Antifa) दहशतवादी संघटना म्हणून घोषित करेल. ट्रम्प यांनी हिंसाचारासाठी अँटिफा नावाच्या डाव्या संघटनांना जबाबदार ठरवले आहे.
या आंदोलनाचे पडसाद इतरही देशांमध्ये उमटले आहेत. वृत्तसंस्था रॉयटर्सच्या वृत्तानुसार रविवारी लंडन आणि बर्लिनमध्ये झालेल्या निषेधानंतर सोमवारी न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया आणि नेदरलँड्समध्ये निदर्शने नोंदविण्यात आली आहेत.
जाणून घ्या नक्की काय प्रकरण –
फसवणूकीच्या आरोपाखाली फ्लॉयड नावाच्या व्यक्तीला पोलीस पकडण्यासाठी गेले होते. जॉर्जला बेड्या ठोकण्यात येत होत्या मात्र जॉर्जने त्याला विरोध केला. त्यानंतर डेरेक चौविन नावाच्या पोलिस अधिकाऱ्याने जॉर्जला जबरदस्तीने जमिनीवर आपटून मारहाण केली. रस्त्यावर पार्क केलेल्या कारच्या मागील चाकाजवळ जॉर्ज जमिनीवर पडला होता आणि डेरेक चौविनने आपल्या डाव्या पायाने जॉर्जचा गळा दाबला. तब्बल सात मिनिटांसाठी जॉर्ज जमिनीवर पडून होता. या दरम्यान जॉर्ज रडत राहिला व आपल्याला श्वास घेता येत नाही... आपल्याला सोडा अशी विनवणी करत राहिला. मात्र त्यात जॉर्जचा मृत्यू झाला. ही घटना एका महिलेने आपल्या कॅमेरामध्ये कैद केली व हा व्हिडिओ व्हायरल झाला.
त्यानंतर या गोष्टीला वर्णभेदाशी जोडले गेले व अमेरिकेसह अनेक देशांत प्रदर्शन व हिंसाचार सुरु झाला. जॉर्ज फ्लॉइडच्या मृत्यूच्या दुसर्या दिवशी झालेल्या निषेधाच्या वेळी, ह्यूस्टन शहरात 100 हून अधिक लोकांना अटक करण्यात आली. फ्लॉयडच्या मृत्यूबद्दलच्या निषेधांनी वॉशिंग्टन आणि अमेरिकेच्या इतर शहरांमध्ये हिंसक रूप धारण केले आहे आणि बर्याच ठिकाणी आगीच्या घटना घडल्या आहेत.
अमेरिकेत ही पहिलीच वेळ नाही जेव्हा वर्णभेदामुळे अशाप्रकारचा हिंसाचार घडला आहे. 2014 मध्ये पोलिस कोठडीत अशीच एक घडणा घडली होती व त्यावेळी मरण पावलेल्या व्यक्तीचे शेवटचे शब्दही ‘मला श्वास घेता येत नाही' असे होते.