Video-Assaulted For Not Wearing Hijab: हिजाब न घातल्यावरुन बेदम मारहाण, इराणी मुलगी कोमात गेल्याचा दावा; वाचा सविस्तर
पोलिसांच्या बेदम मारहाणीमुळे जखमी झालेल्या मुलीला वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Hijab Row Iran: हिजाब घातला नाही म्हणून पोलिसांनी केलेल्या बेदम मारहाणीत 16 वर्षीय इराणी मुलगी (Iranian Girl) गंभीर जखमी झाली आहे. पोलिसांच्या बेदम मारहाणीमुळे जखमी झालेल्या मुलीला वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या तिची प्रकृती चिंताजनक असून ती कोमात असल्याचे सांगितले जात आहे. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, आर्मित गारवांड असे या मुलीचे नाव आहे. मोरल पोलिसांकडून तिला मारहाण झाल्याचा आरोप आहे. दरम्यान, इराण सरकारने मात्र या वृत्ताचे खंडण केले आहे. सरकारने म्हटले आहे की, केवळ रक्तदाब वाढल्याने अल्पवयीन मुलगी बेशुदध झाली होती. ज्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले.
पीडित मुलगी तेहरान मेट्रो जवळ उभी होती. या वेळी तिथे आलेल्या पोलिसांनी तिने हिसाब न घातल्याबद्दल जाब विचारला आणि तिला मारहाण करण्यास सुरुवात केली. तिला झालेली मारहाण इतकी बेदम होती की, ज्यामुळे ती कोमात पोहोचली. सध्या तिच्यावर उपचार सुरु आहेत. मात्र, तिच्या कुटुंबीयांना तिच्यापर्यंत पोहोचू दिले जात नाही, असा दावा राईट्स ग्रुप हेंगॉने केला आहे. पुढे त्यांनी म्हटले की, मोरल पोलिसांनी तेहरान मेट्रोजवळ मुलीला पकडले आणि त्यांचा तिच्याशी हिजाबवरून वाद झाला.
इराणमध्ये अशी घटना घडण्याची ही पहिलीच वेळ नाही. या आधीही इरानमध्ये महसा अमिनी प्रकरण घडले होते. ज्यामुळे संपूर्ण देशभरात महिला आक्रमक झाल्या होत्या. तसेच, हिजाबविरोधात आंदोलन सुरु झाले होते. त्या प्रकरणातही पोलिसांनी नैतिकतेचा दाखला देत तिला प्रचंड प्रमाणावर मारहाण केली होती. ज्यामध्ये तिचा मृत्यू झाला होता. परिणामी देशभर उद्रेक झाला. महिलांनी निदर्शने सुरु केली. हे प्रकरण केवल इराण पुरतेच मर्यादित राहिले नाही. जगभरातील मानवाधिकार कार्यकर्ते आणि इतर देशांनीही हे प्रकरण उचलून धरले. महसा अमिनीला जगभरातून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यावेळी इराण सरकारला प्रचंड टीकेचा सामना करावा लागला होता. शिवाय सरकारही हायअलर्टवर आले होते. देशभरामध्ये सतर्कतेचा इशारा जारी करण्यात आला होता.
व्हिडिओ
अधिक माहिती अशी की, पीडित मुलीशी इस्लामिक पोषाखाची अंमलबजावणी करणाऱ्या अधिकाऱ्यांसोबत जोरदार वादावादी झाली. त्यानंतर तिला मारहाण झाली, असा मानावाधिकार कार्यकर्त्यांनी केलेला दावा सरकारी अधिकाऱ्यांनी फेटाळला आहे. या दाव्याच्या पुष्टीसाठी इराणी-कुर्दिश हक्क गट हेंगॉने तेहरानच्या रुग्णालयातील तिचे बेशुद्ध अवस्थेतील छायाचित्र पोस्ट केले आहे. घडल्या प्रकारानंतर तिला त्याच रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, सरकारने म्हटले आहे की, आम्ही पीडितेला रुग्णालयात दाखल केले आहे. तिच्या प्रकृतीवर आमची बारीक नजर आहे. तसेच, घडलेल्या प्रकाराचीही आम्ही योग्य ती चौकशी करु.