‘या’ देशाच्या अध्यक्षांवर अमेरिकेत 20 वर्षे अंमली पदार्थांची तस्करी केल्याचा आरोप; अटक करणाऱ्याला 112 कोटींचे बक्षीस जाहीर
त्याअंतर्गत किमान 50 वर्षे तुरुंगवासाची शिक्षा किंवा जास्तीत जास्त जन्मठेपेची तरतूद आहे
अमेरिकेने व्हेनेझुएलाचे (Venezuela) अध्यक्ष निकोलस मादुरो (Nicolás Maduro) यांच्यावर 'ड्रग टेररिझम' (Drug Terrorism) पसरवल्याचा आरोप केला आहे. यासोबतच त्यांना अटक करणाऱ्याला 112 कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. अमेरिकेच्या न्याय विभागाने मादुरोवर आरोप केला आहे की, मादुरो यांनी अमेरिकेत कोकेनची तस्करी करणाऱ्या टोळीचे नेतृत्व केले आहे, ज्याद्वारे त्यांनी गेल्या दोन दशकांत अमेरिकेत अमली पदार्थांचा व्यवसाय करून कोट्यवधी डॉलर्सची कमाई केली आहे. न्याय विभागाने आपल्या प्रसिद्धीपत्रकात अध्यक्षांऐवजी सामान्य आरोपी म्हणून मादुरो यांच्या नावाचा उल्लेख केला आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, ‘4 आरोपींवर नार्को-टेररिझम (Narco Terrorism) आणि ड्रग्स तस्करीचे आरोप आहेत. त्याअंतर्गत किमान 50 वर्षे तुरुंगवासाची शिक्षा किंवा जास्तीत जास्त जन्मठेपेची तरतूद आहे. मादुरो आणि वेनेझुएलाच्या उच्च अधिकाऱ्यांनी एका षडयंत्रांतर्गत 20 वर्षांहून अधिक काळ, अमेरिकेत कोकेनचा पुरवठा केला. गुन्हा आणि भ्रष्टाचारात मादुरोचे शासन पूर्णपणे सामील आहे.’
अध्यक्ष मादुरो व्यतिरिक्त अन्य आरोपी अधिकाऱ्यांमध्ये, शनल कॉन्स्चुएन्टी असेंब्लीचे अध्यक्ष डायओकाडो कॅबेलो रोंडन, व्हेनेझुएलायन मिलिटरी इंटेलिजेंसचे माजी सरचिटणीस हुगो कारवाजल बॅरिओस, व्हेनेझुएलायन आर्मीचे माजी जनरल क्लीव्हर अल्काला कॉर्डोनास, तसेच कोलंबियाच्या क्रांतिकारक सशस्त्र सैन्याचे (आरएएफसी) कित्येक सदस्य सामील असल्याचा आरोप आहे.
अॅटर्नी जनरल बार यांच्या म्हणण्यानुसार, मादुरोच्या अटकेसाठी माहिती देणाऱ्यास 112 कोटी रुपये (15 दशलक्ष डॉलर्स) आणि इतर अधिकाऱ्यांच्या अटकेच्या माहितीसाठी 74 कोटी रुपये (10 दशलक्ष डॉलर्स) चे बक्षीस देण्यात येईल. अमेरिकेचे सरकार मादुरो व इतर अधिकाऱ्यांना अटक करण्यासाठी सैन्य तैनात करणार का? या प्रश्नावर अॅटर्नी जनरल यांनी प्रतिसाद देण्यास नकार दिला. (हेही वाचा: परदेशातून आलेल्या महिलेने पोटात लपवून आणले 5 कोटींचे कोकेन असलेल्या 80 कॅप्सूल्स, मुंबई विमानतळावर झाली अटक)
दुसरीकडे कारकस (Caracas) मध्ये, व्हेनेझुएलाचे परराष्ट्रमंत्री जॉर्ज अर्रेज़ा यांनी, अमेरिकेचे सर्व आरोप फेटाळून लावले आणि त्यांच्यावर व्हेनेझुएलाचे सरकार उलथवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. दरम्यान, 2016 मध्ये, रिव्होल्यूशनरी आर्म्ड फोर्सेजने 50 वर्षांच्या संघर्षानंतर कोलंबियन सरकारशी शांतता करारावर स्वाक्षरी केली. मात्र, अमेरिकन अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, मादुरो सरकारच्या संरक्षणाखाली अमेरिकेत ड्रग्जच्या पुरवठ्यात यातील अनेक नाराज गट गुंतले आहेत.