Vaginal Exams: विमानतळावर जबरदस्तीने केली योनीमार्गाची तपासणी: Qatar Airways विरुद्ध महिलांनी दाखल केला दावा

ती म्हणाली, आमच्यासोबत हे सर्व घडल्यानंतरही प्रशासनाला कसलाही पश्चाताप झाला नाही.

Qatar Airways (File Image)

कतार एअरवेजविरोधात (Qatar Airways) 5 ऑस्ट्रेलियन महिलांनी गुन्हा दाखल केला आहे. दोन वर्षांपूर्वी दोहा विमानतळावर प्रवासादरम्यान बंदुकीचा धाक दाखवून त्यांची योनी तपासणी करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. यावेळी त्यांचा मानसिक छळ झाला, त्यांना बेकायदेशीर स्पर्श करण्यात आला व त्यामुळे त्यांना नैराश्य आले व आता त्याबदल्यात त्यांनी आता कतार एअरवेज आणि कतार सिव्हिल एव्हिएशनकडून आर्थिक भरपाई मिळावी, अशी मागणी केली आहे.

माहितीनुसार, 2020 च्या ऑक्टोबरमध्ये या महिला कतार एअरवेजने सिडनीला जात होत्या. त्यात काही ऑस्ट्रेलियन नागरिक होते, काही न्यूझीलंडचे तर काही ब्रिटनचे होते. यातील काहींना विमानातून उतरवून वाहनात बंद करून बंदुकीचा धाक दाखवून गायनेक चाचणीसाठी नेण्यात आले. त्या दिवशी विमानतळावरील बाथरूममध्ये नवजात अर्भक सापडले होते, त्याबाबतच्या चौकशीदरम्यान ही घटना घडली. या बाळाला असे बेवारसपणे कोणी सोडले याची तपासणी प्रशासन करत होते.

या तपासादरम्यान त्यांनी अनेक महिलांच्या चाचण्या घेतल्या. पण काहींना बंदुकीचा धक्का दाखवून त्यांची अंडरवेअर काढण्यास सांगण्यात आले. महिलांच्या म्हणण्यानुसार, यावेळी त्यांना ज्या कठोरतेचा सामना करावा लागला, त्यांना ज्या प्रकारे वागणूक दिली गेली त्यामुळे त्या खूप दुखावल्या गेल्या. आता 2 वर्षांनंतर त्यांनी याबाबत तक्रार दिली आहे. (हेही वाचा: Shocking! माता न तू वैरिणी! नवजात अर्भकाला विमानाच्या टॉयलेटमधील डस्टबिनमध्ये फेकून दिले)

एका 33 वर्षीय महिलेने न्यूयॉर्क टाईम्सला सांगितले की, या घटनेनंतर तिने कुठेही विमानाने प्रवास केला नाही. ती म्हणाली, आमच्यासोबत हे सर्व घडल्यानंतरही प्रशासनाला कसलाही पश्चाताप झाला नाही. त्या दिवसानंतर मी खूप घाबरले आणि पूर्णतः बदलून गेले. कतारच्या अधिकाऱ्यांनी या घटनेबाबत माफी मागितली आहे. याशिवाय ज्या अधिकाऱ्याने अशा चौकशीचे आदेश दिले होते त्यालाही   प्रशासनाने अटक केली आहे व त्याला नोकरीवरून निलंबितही करण्यात आले आहे.

फिफा विश्वचषकापूर्वी 18 उड्डाणे रद्द केल्यामुळे कतार आधीच चर्चेत असताना कतार एअरवेजबाबत अशी तक्रार समोर आली आहे. फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी कतारला येणाऱ्या लोकांसाठी विमानतळावर मोकळ्या जागेची गरज असल्याने त्यांनी त्यांची 18 उड्डाणे रद्द केली आहेत. कतारला स्पर्धेसाठी दिवसाला 500 शटल उड्डाणे तसेच शेकडो चार्टर विमाने आणि खाजगी जेट विमानांची अपेक्षा आहे.