Chinese Apps Banned: चीनी अॅप हटवल्याबद्दल भारताच्या निर्णयाचे अमेरिकेकडून स्वागत
भारताच्या या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. या निर्णयामुळे भारताची अखंडता तसेच आंतर्गत आणि राष्ट्रीय सुरक्षा अधिक मजबूत होईल.
देशातील नागरिकांच्या व्यक्तिगत माहितीसाठी धोका असल्याचे कारण देत भारताने 59 मोबाईल अॅपवर बंदी घातली. देशाच्या इंटरनेट विश्वातून ही अॅप बाहेर गेली. यातील जवळपास सर्वच अॅप चीनी (Chinese Apps Banned) कंपन्यांची आहेत. भारताच्या या निर्णयाचा अमेरिकेला आनंद झाला आहे. त्यामुळे अमेरिकेने भारताच्या या निर्णयाचे जोरदार स्वागत केले आहे. अमेरिकेने म्हटले आहे की, या निर्णयामुळे भारताची राष्ट्रीय सुरक्षीतता अधिक मजबूत होईल. तसेच, चीनी कम्युनिस्ट पार्टीच्या (CCP) हेरगिरीला चाप लागेल.
अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री पॉम्पिओ यांनी म्हटले आहे की, भारतीय नागरिकांची हेरगिरी करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या चीनी अॅपवर भारताने बंदी घातली. भारताच्या या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. या निर्णयामुळे भारताची अखंडता तसेच आंतर्गत आणि राष्ट्रीय सुरक्षा अधिक मजबूत होईल.
लद्दाख प्रदेशात गलवान खोऱ्यात चीनने भारताची कुरापत काढली. यावेळी चीन आणि भारतीय सैन्यात झालेल्या झटापटीत भारताचे 20 जवान शहीद झाले. त्यामुळे भारतात चीनविरोधी संतापाची लाट निर्माण झाली. चीनला धडा शिकवा अशी भावना देशवासियांच्या मनात निर्माण झाली. सरकारवरील दबाव वाढू लागला. (हेही वाचा, TikTok अॅपल अॅप स्टोअर, गूगल प्ले स्टोअर मधून गायब; केंद्र सरकारकडून 59 चीनी अॅप्सवर बंदी)
दरम्यानच्या काळात बॅन चायना प्रॉडॉक्ट ही मोहीम देशभर सुरु झाली. याच काळात सरकारने 59 चीनी मोबाईल अॅपवर बंदी घातली. यात टिक टॉक (TikTok), यूसी ब्राउझर (UC Browser) आणि इतर चिनी अॅप्सचा (Chinese Apps) समावेश आहे. भारताचे सार्वभौमत्व, अखंडता, संरक्षण यांसाठी घातक असल्याचे सांगत या अॅप्सवर बंदी घातली गेली आहे. माहिती तंत्रज्ञान कायदा कलम 69 A अन्वये, माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने ही कारवाी केली आहे. भारताने शेअर इट, एमआय व्हिडीओ कॉल, विगो व्हिडिओ, ब्युटी प्लस, लाइकी, व्हि मेट, यूसी न्यूज या अॅप्सवरही सरकारने बंदी घातली आहे.