IPL Auction 2025 Live

US Presidential Elections 2020: अमेरिकेमधील राष्ट्रपतीपदाच्या निवडणुका पुढे ढकलल्या जाणार? डोनाल्ड ट्रम्प यांचा, मतदान 'सुरक्षित' होईपर्यंत निवडणूक स्थगित करण्याचा सल्ला

अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी निवडणुका पुढे ढकलल्याचे संकेत दिले आहेत. सध्या अमेरिकेमध्ये नोव्हेंबरमध्ये अध्यक्षीय निवडणुका प्रस्तावित आहेत

President Donald Trump | (Photo Credits: AFP)

अमेरिकेत (US) होऊ घातलेल्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकी (US Presidential Election) विषयी मोठी बातमी समोर येत आहे. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी निवडणुका पुढे ढकलल्याचे संकेत दिले आहेत. सध्या अमेरिकेमध्ये नोव्हेंबरमध्ये अध्यक्षीय निवडणुका प्रस्तावित आहेत, मात्र या निवडणुका पुढे ढकलल्या जाण्याची शक्यता आहे. यासह ट्रम्प यांनी मेल-इन व्होटिंग घोटाळ्याच्या आपल्या दाव्यांचा पुनरुच्चार केला आहे. ते म्हणाले, ‘अमेरिकेसाठी ही मोठी लाजिरवाणी गोष्ट आहे कारण 2020 ची निवडणूक ही इतिहासातील सर्वात भ्रष्ट निवडणूक असेल.’ याबाबत नुकतेच त्यांनी ट्वीट केले आहे.

गेले अनेक महिने अमेरिकेच्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची चर्चा आहे. आता राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्वीट केले आहे की, 'युनिव्हर्सल मेल-इन मतदानामुळे (सध्याच्या काळात मतदानासाठी अनुपस्थित राहणे ही चांगलीच गोष्ट आहे) 2020 मधील राष्ट्रपती पदाची निवडणूक ही इतिहासातील सर्वात भ्रष्ट आणि चुकीची निवडणूक ठरेल. ही अमेरिकेसाठी शरमेची बाब ठरेल. जोपर्यंत लोक योग्यरितीने आणि सुरक्षित मतदान करू शकत नाहीत तोपर्यंत निवडणूक पुढे ढकली जाऊ शकत नाही?'

पहा डोनाल्ड ट्रम्प ट्वीट -

यापूर्वी मंगळवारी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मेल-इन बॅलेटला (ईमेल किंवा पत्राद्वारे मतदान) विरोध केला होता. अ‍ॅरिझोनाच्या निवडणूक रॅलीत ट्रम्प म्हणाले- '2020 च्या निवडणुकीत मतदान हे ईमेलद्वारे देण्याचे मंजूर झाले तर काय होईल याचा विचार करा. ही सर्व मते कोणाला मिळतील?' अमेरिकन अध्यक्षांनी असा दावा केला की, डेमोक्रेट्स पक्ष कोरोना व्हायरसचे कारण देऊन  लोकांना मत देण्यापासून रोखू इच्छित आहेत. ते म्हणाले- डेमोक्रेट्स सध्याच्या साथीच्याआड मतपत्रिकेत कोट्यावधी बनावट मेल पाठवून निवडणुकीत फसवणूक करण्याचा प्रयत्न करीत आहेत.

(हेही वाचा: अमेरिकेत COVID-19 मृत्यूचे तांडव सुरुच! मागील 24 तासांत 1267 रुग्ण दगावल्याची जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाने दिली माहिती)

दरम्यान, कोरोना व्हायरसच्या दृष्टीने अमेरिकेच्या निवडणुकीत मेल-इन मतपत्रिकेची मागणी होत आहे. डेमोक्रॅटिक पक्ष याला पाठिंबा देत आहे व ट्रम्प यांचा रिपब्लिक पक्ष याला विरोध करीत आहे. 2016 मध्ये, जवळजवळ एक चतुर्थांश अमेरिकन लोकांनी मेलद्वारे मतदान केले होते. अलिकडच्या काळात ट्रम्प, उपराष्ट्रपती माइक पेंस, फर्स्ट लेडी मेलेनिया, ट्रम्प यांची मुलगी इव्हांका, जावई जेरेड कुश्नर, व्हाईट हाऊसचे प्रेस सचिव केलेग मॅककेनी आणि अ‍ॅटर्नी जनरल यांनीही मेल व्होटिंगचा वापर केला आहे.