Pulwama Terror Attack: भारत-पाकिस्तान मधील परिस्थिती अत्यंत वाईट आणि भयानक; पुलवामा हल्ल्यावर डोनाल्ड ट्रम्प यांची भूमिका
यानंतर भारत-पाकिस्तानच्या नात्यात तणाव निर्माण झाला आहे. यासंदर्भात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपली प्रतिक्रीया व्यक्त केली आहे.
Pulwama Terror Attack: 14 फेब्रुवारीला जम्मू-काश्मीर येथील पुलवामा परिसरात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात CRPF चे 40 जवान शहीद झाले. यानंतर देशात संतापाची लाट उसळली असून भारत-पाकिस्तानच्या नात्यात तणाव निर्माण झाला आहे. यासंदर्भात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (US President Donald Trump) यांनी आपली प्रतिक्रीया व्यक्त केली आहे. "भारत-पाकिस्तानमध्ये अत्यंत भयंकर गोष्टी घटत आहेत. ही अत्यंत वाईट परिस्थिती असून दोन्ही देशात भयावह परिस्थिती आहे. पुलवामा हल्ल्यात अनेक लोकांचा बळी गेला. हे सर्व थांबलेले बघायला आम्हाला आवडेल," अशा शब्दांत ट्रम्प यांनी आपली भूमिका मांडली.
ट्रम्प पुढे म्हणाले की, "भारत काहीतरी मोठे करण्याचा विचार करत आहे. भारताने आताच आपले 50 सैनिक गमावले आहेत. अनेक लोक याबद्दल बोलत आहेत. मात्र हा मुद्दा अत्यंत नाजूक आहे. आता काश्मीरमध्ये जे काही झाले त्यामुळे दोन्ही देशातील ताण, समस्या अधिकच वाढल्या आहेत. हे सर्व खूप भयंकर आहे. "
या सर्व पार्श्वभूमीवर न्युयॉर्क स्थित पाकिस्तान दूतावासा बाहेर अमेरिकेतील भारतीय नागरिकांनी आपला निषेध नोंदवला. 'पाकिस्तान विश्वातील दहशतवादी देश आहे,' अशी पोस्टर झळकवत घोषणाबाजी केली. पुलवामा दहशतवादी हल्ल्यावर अमेरिकेची पहिली प्रतिक्रीया; हल्ला 'Horrible' असल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांचे मत
पुलवामा हल्ल्यानंतर विविध मार्गांनी भारतीय आपला रोष, आक्रोश व्यक्त करत आहेत. भारताने देखील पाकिस्तान विरोधात कठोर भूमिका घ्यायला सुरुवात केली आहे. मात्र भारताने युद्ध छेडल्यास त्यास तोडीस तोड उत्तर देऊ, अशी भूमिका पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी मांडली आहे.