H-1B Visa संख्या मर्यादित; अनेकांच्या अमेरिका वारीच्या स्वप्नांना धक्का

H-1B Visa हा गैर-प्रवासी व्हिसा आहे जो, अमेरिकेतील कंपन्यांना विदेशातील कर्मचारी, कामगार खास करुन तांत्रज्ञान अभ्यासक, विश्लेषक आदी लोकांना अमेरिकेत नोकरी देण्यास मान्यता देतो.

H1B Visas | Image used for representational purpose | (Photo Credits: PTI)

अमेरिका आर्थिक वर्ष 2020 च्या नव्या धोरणामुळे जगभरातील अनेक नागरिक आणि प्रवाशांना धक्का बसला आहे. अमेरिकेने 2020 या आर्थिक वर्षात एच-1बी (H-1B Visa) व्हिसा संख्या आता मर्यादित केली आहे. अमेरिका सरकारच्या नव्या धोरणानुसार H-1B Visa संख्या आता केवळ 65,000 इतकी मर्यादित करण्यात आली आहे.

काय आहे H-1B Visa, कोणासाठी महत्त्वाचा?

जगभरातील विविध देशांमधून अनेक नागरिक अमेरिकेमध्ये शिक्षण, व्यवसाय, नोकरी आणि इतर कारणांसाठी येतात. अशा नागरिकांसाठी अमेरिकेतील वास्तव्यासाठी H-1B Visa अत्यंत महत्त्वाचा असतो. H-1B Visa हा गैर-प्रवासी व्हिसा आहे जो, अमेरिकेतील कंपन्यांना विदेशातील कर्मचारी, कामगार खास करुन तांत्रज्ञान अभ्यासक, विश्लेषक आदी लोकांना अमेरिकेत नोकरी देण्यास मान्यता देतो. (हेही वाचा, अमेरिका-मेक्सिको सीमेवर महाकाय भिंत, डोनाल्ड ट्रम्प यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प; पेंटॅगॉनकडून तब्बल 1 अब्ज डॉलर मंजूर)

यूएससीआयएसकडून धोरण स्पष्ट

तंत्रज्ञान विषयक काम करणाऱ्या अमेरिकेतील कंपन्या भारत, चीन आदी देशांमधून कर्मचारी वर्ग बोलावण्यासाठी H-1B Visa वर अवलंबून असतात. H-1B Visa अर्जांना मान्यता देण्याशी संबंधीत संस्था यूएससीआयएस (US Citizenship and Immigration Services) ने शुक्रवारी सांगितले की, 'यंदा आर्थिक वर्ष 2020 साठी अमेरिकी काँग्रेसकडून H-1B Visa संख्या कमी करण्यात आली असून, ती केवळ 65000 इतकीच ठेवण्यात आली आहे.'

अमेरिकेचे आर्थिक वर्ष 1 ऑक्टोबर 2019 पासून सुरु होईल. USCIS ला एक एप्रिल पासून Visa घेण्यासाठी अर्ज येण्यास सुरुवात जाली. मात्र H-1B Visa देणाऱ्या या संस्थेने हे मात्र स्पष्ट केले नाही की, पहिल्या पाच दिवसांमध्ये किती अर्ज प्राप्त झाले.