अमेरिका मध्यावधी निवडणूका निकाल 2018: डोनाल्ड ट्रम्प यांना झटका, सिनेटवर वर्चस्व पण हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटीव्हमध्ये डेमोक्रॅटीक पक्षाची मुसंडी
डोनाल्ड ट्र्म्प यांनी सिनेटमध्ये वर्चस्व राखल्याची माहिती हाती येताच ट्विटरच्या माध्यमातून नागरिकांचे धन्यवाद मानले आहेत.
अमेरिकेमध्ये मध्यावधी निवडणुकींचे निकाल जाहीर होण्यास सुरूवात झाली आहे. अमेरिकन संसदेमध्ये सिनेट आणि हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटीव्ह या दोन सभागृहांच्या 435 जागांसाठी मतदान झाले. या मतदानाचे निकाल हळूहळू हाती येण्यास सुरूवात झाली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाने सिनेटमध्ये वर्चस्व मिळवले आहे मात्र हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटीव्ह गमावले आहे. त्यामुळे हा डोनाल्ड ट्रम्पसाठी झटका मानला जात आहे.
मंगळवारी अमेरिकेत मध्यावधी निवडणूकांसाठी मतदान पार पडले. त्याचे निकालही हातात येण्यास सुरूवात झाली आहे. सिनेटमध्ये 100 पैकी 35 जागा आणि हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटीव्हमध्ये 435 उमेदवार निवडून येणार आहे. सिनेटमध्ये निम्म्या जागांवर म्हणजे 50 जागा रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवारांनी जिंकल्या आहेत. 40 डेमोक्रॅटीक पक्षाकडे आहेत. उर्वरित जागांचे निकाल लवकरच हाती येतील . डोनाल्ड ट्र्म्प यांनीदेखील सिनेटमध्ये वर्चस्व राखल्याची माहिती हाती येताच ट्विटरच्या माध्यमातून नागरिकांचे धन्यवाद मानले आहेत.
हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटीव्हमध्ये 435 जागांपैकी 287 जागांचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. रिपब्लिकन पक्षाने आत्तापर्यंत 149 तर डेमोक्रॅटीक पक्षाने 139 जागा मिळावल्या आहेत. यंदाच्या अमेरिकन मध्यावधी निवडणुकांमध्ये भारतीय वंशाच्या अनेक उमेदवारांचा बोलबाला आहे. डेमोक्रेटिक पक्षाने 12 भारतीय वंशाच्या उमेदवारी दिली होती. भारतीय वंशाच्या या उमेदवारांना समोसा ब्रिगेड म्हणून ओळखलं जातं.