Turkey-Syria Earthquake: तुर्किये आणि सीरियामधील भूकंपातील मृतांचा आकडा 35,000 च्या वर; निकृष्ट इमारती बनवणाऱ्या 130 हून अधिक कंत्राटदारांना अटक

या वर्षी तुर्कस्तानमध्ये राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकाही होणार आहेत. तुर्कस्तान आधीच उच्च चलनवाढ आणि खराब अर्थव्यवस्थेशी झुंजत आहे. यानंतर आता भूकंपामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली आहे.

Turkey Earthquake. (Photo Credits: Twitter@DDNewslive)

भीषण विनाशाचा सामना करत असलेल्या तुर्कस्तानला पुन्हा एकदा भूकंपाचा धक्का बसला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रविवारी तुर्कीच्या आग्नेय भागात कहरामनमारासमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले, ज्याची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.7 मोजली गेली. यापूर्वी 6 फेब्रुवारीला तुर्की आणि सीरियामध्ये 7.8 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप (Turkey-Syria Earthquake) झाला होता. एक-दोन दिवसांनंतरही अनेक वेळा भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत. तुर्की आणि सीरियामध्ये गेल्या सोमवारच्या विनाशकारी भूकंपानंतर 35,000 हून अधिक लोक मरण पावले आहेत आणि हजारो जखमी झाले आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, रविवारी तुर्कीच्या भूकंपात मृतांची संख्या 30,000 च्या वर गेली आहे, तर सीरियाच्या वायव्येकडील बंडखोरांच्या ताब्यात असलेल्या भागात 5,000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

तुर्कस्तानच्या दहा प्रांतांमध्ये झालेल्या भूकंपामुळे 25 हजारांहून अधिक इमारती उद्ध्वस्त झाल्या आहेत. तज्ज्ञांच्या मते, ढिगाऱ्यात अजूनही 10,000 हून अधिक मृतदेह असू शकतात. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनसह अनेक तज्ञ संस्थांनी असा अंदाज वर्तवला आहे की, मृतांची एकूण संख्या 50 हजारांपेक्षा जास्त असू शकते. तज्ज्ञांसोबतच, तुर्कस्तानमधील बहुतेक लोकांचा असाही विश्वास आहे की भूकंपामुळे मोठ्या प्रमाणावर झालेल्या विनाशाचे कारण प्रत्यक्षात निकृष्ट बांधकाम आहे. सरकारने वेळीच पावले उचलली असती तर भूकंपामुळे हानी झाली असती, पण ती काही प्रमाणत टाळता आली असती.

यूएन रिलीफ प्रमुख मार्टिन ग्रिफिथ्स यांनी या आठवड्याच्या सुरुवातीला दक्षिण तुर्की आणि वायव्य सीरियाला झालेल्या शक्तिशाली भूकंपाचे वर्णन शतकातील सर्वात भीषण भूकंप म्हणून केले आहे. तुर्कस्तानमध्ये निकृष्ट इमारती बनवणाऱ्या 130 हून अधिक कंत्राटदारांना अटक करण्यात आली आहे. तुर्कीचे उपाध्यक्ष फुआत ओक्ते यांनी सांगितले की, शनिवारी 131 बांधकाम व्यावसायिक आणि कंत्राटदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी करण्यात आले होते, त्यापैकी 130 जणांना रविवारी दुपारपर्यंत अटक करण्यात आली आहे. या सर्व कंत्राटदारांवर तुर्कस्तानच्या विविध शहरांमध्ये निकृष्ट इमारती बनवल्याचा आरोप आहे. सोमवारी झालेल्या भूकंपात त्यांनी बांधलेल्या बहुतांश इमारती कोसळल्या आहेत.

तुर्कीमध्ये इमारत बांधकाम संहिता लागू आहे. याअंतर्गत नियमानुसार भूकंपप्रूफ इमारती बंधने बंधनकारक आहे. परंतु हा नियम धाब्यावर बसवून तुर्कीमध्ये लाखो इमारती बांधल्या गेल्या आहेत, ज्यांचे बांधकाम अत्यंत निकृष्ट आहे. तुर्कीच्या कायदा मंत्रालयाच्या आदेशानुसार, सरकारी वकिलांनी इमारतींच्या निकृष्ट बांधकामाचे पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली आहे. तुर्कीच्या कायदा मंत्र्यांनी शनिवारी या प्रकरणाची फौजदारी चौकशी करण्याचे आदेश दिले. या अंतर्गत बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कोडचे उल्लंघन करून निकृष्ट बांधकामासाठी जबाबदार असलेल्या सर्वांवर दंडात्मक कारवाई केली जाईल. (हेही वाचा: Operation Dosti: भारतीय NDRF च्या श्वानपथकातील Romeo आणि Julie ची कौतुकास्पद कामगिरी; भूकंपग्रस्त टर्कीत 6 वर्षीय मुलीला शोधून वाचवण्यात बजावली मोलाची भूमिका)

भूकंपामुळे तुर्कस्तानचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यप अर्दुआन यांना लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागले आहे. या वर्षी तुर्कस्तानमध्ये राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकाही होणार आहेत. तुर्कस्तान आधीच उच्च चलनवाढ आणि खराब अर्थव्यवस्थेशी झुंजत आहे. यानंतर आता भूकंपामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. दरम्यान, परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी सांगितले की, भारताने रविवारी ऑपरेशन दोस्त अंतर्गत मदत सामग्रीने भरलेले सातवे विमान पाठवले. हे विमान सीरियातील दमास्कसला पोहोचले. विमानात 35 टनांहून अधिक मदत सामग्री पाठवण्यात आली. भारताने आतापर्यंत 200 टनांहून अधिक मदत सामग्री आणि 250 हून अधिक बचाव कर्मचारी तुर्की आणि सीरियाला पाठवले आहेत.