Turkey Earthquake : भूकंपातील मृतांची संख्या 40 हजारांवर

सध्या आंतरराष्ट्रीय मदतीच्या जोरावर बचाव कार्य हे सुरु असून या भूकंपातून वाचलेल्या नागरिकांनाही मोठ्या प्रमाणावर समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

Earthquake (PC- Pixabay)

तुर्कस्थान आणि सीरियात (Turkey-Syria Earthquake) ६ फेब्रुवारी रोजी झालेल्या विनाशकारी भूकंपातील मृतांची संख्या ४० हजारांवर पोहचली असून अजूनही मृतदेह सापडत असल्याने ही संख्या आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या भूकंपाचा फटका बसलेल्या तीन प्रांतांमध्ये ढिगाऱ्याखाली दबलेल्या लोकांना काढण्यासाठी बचाव मोहीम अविरत सुरु असून भारतासह अनेक देशातील जवानांनी या शोध मोहिमेत सहभाग घेतला आहे.

या भूकंपाचा सर्वात मोठा फटका बसलेला तुर्कस्थानमध्ये ३७ हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर सीरियामध्ये बंडखोरांच्या ताब्यातील वायव्य भागात दोन हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, तर सरकारच्या ताब्यात असलेल्या भागात दिड हजाराच्यावर लोकांचा मृत्यू झाला आहे. सीरियात मृत पावलेल्यांची एकुण संख्या ही साडे तीन हजारापेक्षा अधिक आहे. तुर्कस्तानच्या दहा प्रांतांमध्ये झालेल्या भूकंपामुळे ४० हजारांहून अधिक इमारती उद्ध्वस्त झाल्या आहेत. तज्ज्ञांच्या मते, ढिगाऱ्यात अजूनही अनेक मृतदेह असू शकतात.  (Turkey Earthquake: तुर्कस्तानमध्ये विनाशकारी भूकंपानंतर सुमारे 198 तासा मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या 2 जणांची सुखरुप सुटका)

या विनाशकारी भूकंपातून वाचलेल्या नागरिकांना देखील अनेक समस्येंना तोडं द्यावे लागत आहे. ऐन थंडीत अनेकांना रस्त्यावर रहावे लागत आहे. अनेक परिसरातील पाणीपुरवठा हा ठप्प झाला आहे. तुकस्थानातील सरकराने आता वाचलेल्या नागरिकांना अन्न, पाणी देणे त्यांच्यासाठी तात्पुरत्या निवाऱ्यांची सोय करणे यावर लक्ष केंद्रीत करणार असल्याचे सांगितले आहे. तुर्कस्थानच्या राष्ट्रपतीने आपण आपल्या नागरिकांना सर्व प्रकारची मदत करणार असल्याचे जाहीर केले.

या देशांमध्ये ६ तारखेला ७.८ रिश्टर स्केलचा भूकंप झाला आहे. भूकंपाच्या २०० हून अधिक तासांनंतर आता ढिगाऱ्यातून लोक जिवंत सापडण्याची आशा संपली आहे.