Tattoo Record: वृद्ध जोडप्याने केला टॅटू काढून घेण्याचा विक्रम; तब्बल 2,000 तास घालवले खुर्चीवर

याबाबत तिला पूर्ण समाधान आहे.

Tattoo Record (संग्रहित संपादित प्रतिमा)

बॉडी मॉडिफिकेशनचे फॅड कधी कधी लोकांना खूप विचित्र गोष्टी करायला भाग पाडते. असेच एक आश्चर्यकारक प्रकरण समोर आले आहे. एका वृद्ध जोडप्याने वर्षानुवर्षे आपल्या शरीरावर एकामागून एक इतके टॅटू (Tattoo) बनवले आहेत की, आता ते जगातील सर्वात जास्त टॅटू असलेले जोडपे बनले आहेत. म्हातारपणात त्यांनी आपला हा छंद पूर्ण केला आणि तो एक विक्रमही (Guinness World Records) बनला आहे.

अमेरिकेतील एका वृद्ध जोडप्याने 2000 तास खुर्चीवर बसून संपूर्ण शरीर टॅटूने भरून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. स्वत:ला चालते-फिरते कलादालन म्हणवून घेणाऱ्या या जोडप्याच्या 90 टक्क्यांहून अधिक शरीरावर टॅटू भरलेले आहेत. चक हेल्मके (Chuck Helmke) वय- 81 आणि शार्लोट गुटेनबर्ग (Charlotte Gutenberg) वय- 74 अशी त्यांची नावे आहेत.

स्वतःच्या अंगावर रंगीबेरंगी टॅटू बनवणारी शार्लोट म्हणते- ‘गोरे शरीर निळे केले, परंतु त्यानेही समाधान झाले नाही, म्हणून मी शरीरावर इतके रंग भरले की आता मी एक फिरते कलादालन बनले आहे,’ वयाच्या 74 व्या वर्षी आपल्या शरीराचा 98 टक्के भाग टॅटूने भरून गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवणारी ती सर्वात वयस्कर महिला बनली आहे. तिचे पती चक यांनीही त्यांच्या शरीरावर 97 टक्के टॅटू गोंदवले आहेत आणि वयाच्या 84 व्या वर्षी ते असे करणारे सर्वात वयस्कर पुरुष ठरले आहेत.

या दोघांनी सर्वात जास्त टॅटू असलेले वृद्ध जोडपे म्हणून गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपले नाव नोंदवले आहे. शार्लोटने सर्वाधिक डोक्यावर टॅटू काढण्याचा विक्रमही केला आहे. फ्लोरिडा येथील शार्लोट गुटेनबर्ग आणि तिचे पती चक यांनी त्यांचा टॅटूचा छंद पूर्ण करत शरीरावर वेगवेगळ्या रंगांचे डिझाइन काढून घेण्यासाठी खुर्चीवर 2,000 तासांपेक्षा जास्त वेळ घालवला आहेत. (हेही वाचा: Guinness World Records : मालदिव्हच्या पाण्यात ‘अंडर वॉटर किस’ करत कपलने गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केला (Watch Video))

शार्लोटने वयाच्या 57 व्या वर्षी तिचा पहिला टॅटू बनवला होता आणि तेव्हापासून ही प्रक्रिया चालू राहिली आणि आता वयाच्या 74 व्या वर्षी तिचे जवळजवळ संपूर्ण शरीर टॅटूने झाकलेले आहे. याबाबत तिला पूर्ण समाधान आहे. चकने 18 वर्षांचा असताना आपला पहिला टॅटू बनवला. अनेक वर्षे त्याने यूएस आर्मीमध्ये काम केले. महत्वाचे म्हणजे शार्लोट आणि चार्ल्स हे एका टॅटू पार्लरमध्ये भेटले होते.