'धूम्रपान करणाऱ्यांकडे टक लावून तिरस्काराने पाहा'; तंबाखूला आळा Hong Kong प्रशासनाचे जनतेला आवाहन
याबाबत प्रशासनाने जनतेचे सहकार्य मागितले आहे. हाँगकाँगमधील रेस्टॉरंट्स आणि कामाच्या ठिकाणी सिगारेट ओढल्यास HK$1,500 दंड आकारला जातो.
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) नुसार, तंबाखूमुळे (Tobacco) जगभरात दरवर्षी 7 दशलक्ष लोकांचा मृत्यू होतो. त्यापैकी 20 लाख लोकांचा मृत्यू हृदयविकारामुळे होतो. मात्र असे असूनही सिगारेट (Cigarettes) ओढणाऱ्या लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सिगारेटच्या पाकीटावरही धुम्रपान आरोग्यासाठी हानिकारक असल्याचे लिहिलेले असते, मात्र त्याचा काहीही परिणाम सिगारेट ओढणाऱ्यांवर होताना दिसून येत नाही. सिगारेटमुळे फक्त धूम्रपान करणाऱ्याच्याच नाही तर, ज्या लोकांपर्यंत या सिगारेटचा धूर पोहोचतो, त्यांच्या आरोग्यावरही परिणाम होतो.
आता यावर मात करण्यासाठी आणि लोकांना सिगारेटच्या व्यसनापासून मुक्त करण्यासाठी हाँगकाँग (Hong Kong) सरकारने एक कल्पक मोहीम सुरू केली आहे. हाँगकाँग सरकारने लोकांना आवाहन केले आहे की, सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करताना दिसणाऱ्या व्यक्तीकडे तिरस्काराने किंवा एकटक पाहण्यास सुरुवात करा. सिगारेट ओढणार्या लोकांकडे सतत पाहिल्यास त्यांचे कृत्य पूर्णपणे चुकीचे असल्याचे त्यांच्या लक्षात येईल.
हाँगकाँगचे आरोग्य सचिव, प्रोफेसर लो यांनी शुक्रवारी विधान परिषदेच्या आरोग्य सेवा पॅनेलच्या बैठकीत सांगितले की, ‘सिगारेट ओढणाऱ्यांकडे एकटक पाहिल्याने समाजात धूम्रपान न करण्याची संस्कृती वाढीस लागेल. आजूबाजूचे सर्वच लोक आपल्याकडे पाहत असल्याचे लक्षात आल्यावर धूम्रपान करणारे लोक त्यावर प्रतिक्रिया देऊ शकत नाहीत.’
लो पुढे म्हणाले की, सिगारेट आपल्या सर्वांच्या आरोग्याला हानी पोहोचवू शकते. जर एखाद्या रेस्टॉरंटमध्ये कोणी सिगारेट ओढताना दिसले तर लोक त्यांच्याकडे तिरस्काराने पाहतील. अशावेळी ओशाळून असे लोक सिगारेट्स ओढणे सोडून देतील. लो पुढे म्हणाले की, सार्वजनिक ठिकाणी पोलीस प्रशासन नेहमीच उपस्थित असतील असे नाही अशावेळी जनता प्रशासनाला सहकार्य करू शकते. (हेही वाचा: Xylazine Crisis in Philadelphia: झोंबी आजाराने नागरिक हैराण, पाहा व्हिडिओ)
हाँगकाँग प्रशासनाने धूम्रपान रोखण्यासाठी कायदेशीर उपाययोजना मजबूत करण्याचे आश्वासन दिले. याबाबत प्रशासनाने जनतेचे सहकार्य मागितले आहे. हाँगकाँगमधील रेस्टॉरंट्स आणि कामाच्या ठिकाणी सिगारेट ओढल्यास HK$1,500 दंड आकारला जातो. मात्र, सरकार सिगारेट ओढणाऱ्यांवर कोणतीही ठोस कारवाई करण्यास सध्या असमर्थ आहे.