Sri Lanka: आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी सरकार विकणार विमान कंपनी; पगार देण्यासाठी छापल्या जाणार नव्या नोटा

श्रीलंकेचे नवे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी सोमवारी राष्ट्राला टेलिव्हिजनद्वारे संबोधित करताना सांगितले की, ‘मी श्रीलंकेच्या एअरलाइन्सचे खाजगीकरण करण्याचा प्रस्ताव मांडत आहे, ज्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे

श्रीलंका पंतप्रधान रानिल विक्रमसिंगे (Image Credit: pmoffice.gov.lk)

श्रीलंकेच्या (Sri Lanka) नव्या सरकारने देशातील वाढती आर्थिक संकटे कमी करण्यासाठी आणि होत असलेला तोटा टाळण्यासाठी आपली राष्ट्रीय विमानसेवा विकण्याची योजना आखली आहे. नव्या सरकारकडून सरकारी अधिकाऱ्यांना पगार देण्यासाठी नव्या नोटा छापण्यात येणार आहेत. श्रीलंकेचे नवे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी सोमवारी राष्ट्राला टेलिव्हिजनद्वारे संबोधित करताना सांगितले की, ‘मी श्रीलंकेच्या एअरलाइन्सचे खाजगीकरण करण्याचा प्रस्ताव मांडत आहे, ज्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. मार्च 2021 ला संपलेल्या आर्थिक वर्षात श्रीलंकन ​​एअरलाइनला 45 अब्ज रुपये ($124 दशलक्ष) तोटा झाला होता. आम्ही श्रीलंकन ​​एअरलाइन्सचे खाजगीकरण केले तरी तोटा आम्हाला सहन करावा लागेल.’

श्रीलंकेला सध्या अभूतपूर्व आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे आणि देश परदेशी कर्जाच्या बाबतीत डिफॉल्टर होण्यापासून काही दिवस दूर आहे. विक्रमसिंघे म्हणाले की, देशात फक्त एक दिवसाचा पेट्रोलचा साठा आहे आणि सरकार कच्च्या तेलाच्या आणि भट्टीतील तेलाच्या तीन जहाजांची किंमत मोजण्यासाठी खुल्या बाजारात डॉलर गोळा करण्याचा प्रयत्न करत आहे. ही जहाजे सध्या श्रीलंकेच्या किनारपट्टीवर पोहोचली आहे.

श्रीलंकेच्या बुडत्या अर्थव्यवस्थेला भारताकडून मोठी मदत मिळत आहे. बिघडलेल्या परिस्थितीमध्ये भारत श्रीलंकेसाठी तारणहार म्हणून पुढे आला आहे. पीएम विक्रमसिंघे यांनी सांगितले की, भारतीय क्रेडिट सुविधेतून डिझेलच्या आणखी दोन खेप 18 मे आणि 1 जून रोजी येणार आहेत. याशिवाय 18 आणि 29 मे पर्यंत पेट्रोलच्या दोन खेपा श्रीलंकेत पोहोचण्याची अपेक्षा आहे. यानंतर श्रीलंकेतील पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा बऱ्याच अंशी कमी होईल. (हेही वाचा: देशातील आर्थिक संकटांदरम्यान Ranil Wickremesinghe बनले श्रीलंकेचे नवे पंतप्रधान; पाचव्यांदा घेतली शपथ)

दरम्यान, 1948 मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर श्रीलंका सर्वात वाईट आर्थिक संकटातून जात आहे. परकीय चलनाच्या तीव्र टंचाईमुळे इंधन, स्वयंपाकाचा गॅस आणि इतर जीवनावश्यक वस्तू महाग झाल्या आहेत. यासाठी जनतेच्या लांबलचक रांगा लागल्या आहेत. त्यात वीज कपात आणि अन्नधान्याच्या वाढत्या किमतींमुळे लोकांच्या त्रासात भर पडली आहे.