Russia-Ukraine War: 'कोणत्याही शांतता प्रयत्नात योगदान देण्यासाठी भारत तयार'; PM Narendra Modi आणि Volodymyr Zelenskyy यांच्यामध्ये फोनवर संवाद
त्यांनी अधोरेखित केले की, आण्विक सुविधा धोक्यात आल्याने सार्वजनिक आरोग्य आणि पर्यावरणासाठी दूरगामी आणि आपत्तीजनक परिणाम होऊ शकतात.
युक्रेन आणि रशिया यांच्यात सुरू असलेल्या युद्धादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी मंगळवारी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की (Ukrainian President Volodymyr Zelenskyy) यांच्याशी फोनवर चर्चा केली. यादरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये युक्रेनमध्ये सुरू असलेल्या संघर्षावर बराच वेळ चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. पंतप्रधान मोदींनी युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांना संवाद आणि मुत्सद्देगिरीच्या माध्यमातून या युद्धाचा मार्ग काढण्यास सांगितले आहे. झेलेन्स्की यांना शत्रुत्व त्वरीत संपवण्याची आणि संवाद आणि मुत्सद्देगिरीचा मार्ग अवलंबण्याची गरज असल्याचा पुनरुच्चार केला.
फोनवरील संभाषणादरम्यान पंतप्रधान मोदींनी संघर्षावर लष्करी तोडगा निघू शकत नाही, असा विश्वास व्यक्त केला. त्याचवेळी त्यांनी असेही म्हटले आहे की, कोणत्याही शांततेच्या प्रयत्नात योगदान देण्यासाठी भारत नेहमीच तयार आहे. पीएमओने ट्विट करून ही माहिती दिली आहे. या संभाषणात पंतप्रधानांनी संयुक्त राष्ट्रांची सनद, आंतरराष्ट्रीय कायदा आणि सर्व राज्यांच्या सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेचा आदर करण्याच्या महत्वतेचा पुनरुच्चार केला.
युक्रेनसह आण्विक प्रतिष्ठानांच्या सुरक्षेला भारत देत असलेल्या महत्त्वावर पंतप्रधान मोदींनी भर दिला. त्यांनी अधोरेखित केले की, आण्विक सुविधा धोक्यात आल्याने सार्वजनिक आरोग्य आणि पर्यावरणासाठी दूरगामी आणि आपत्तीजनक परिणाम होऊ शकतात. (हेही वाचा: रशियाकडून Nuclear Attack ची जोरदार तयारी? युक्रेनच्या फ्रंट लाईनकडे जाणाऱ्या अण्वस्त्रांच्या ताफ्याचा व्हिडीओ व्हायरल)
याआधी मार्चच्या सुरुवातीला पंतप्रधान मोदींनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की यांच्याशी फोनवर चर्चा केली होती. त्यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास 35 मिनिटे चर्चा झाली. यावेळी पंतप्रधान मोदींनी युक्रेनमधून भारतीयांना सुरक्षित बाहेर काढल्याबद्दल झेलेन्स्की यांचे आभार मानले होते. संघर्षामुळे झालेल्या जीवित आणि मालमत्तेच्या हानीबद्दल पंतप्रधानांनी तीव्र शोक व्यक्त केला होता. पीएम मोदींनी संवाद आणि हिंसाचार तात्काळ संपवण्याच्या त्यांच्या आवाहनाचा पुनरुच्चार केला आणि शांतता प्रयत्नांमध्ये शक्य तितके योगदान देण्याची भारताची तयारी दर्शविली.