Robot Judge: ऐकावे ते नवलच! China ने बनवला जगातील पहिला 'रोबोट जज'; 97 टक्के अचूक निर्णय घेण्याची क्षमता
अशा स्थितीत चुकीचा निर्णय झाला तर त्याला जबाबदार कोण?
तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात चीन (China) सातत्याने वेगाने काम करत आहे आणि नवीन उत्पादने विकसित करत आहे. आता चीनमधील शास्त्रज्ञांच्या टीमने कृत्रिम बुद्धिमत्तेवर म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर (Artificial Intelligence) आधारित एक असे मशीन विकसित केल्याचा दावा केला आहे, जे गुन्हेगारांविरुद्ध शिक्षा सुनावू शकते. जगातील अशा प्रकारचे हे पहिलेच मशीन आहे. हा रोबो न्यायाधीश (Robot Judge) तोंडी युक्तिवाद ऐकून 97 टक्के योग्य निर्णय देतो, असाही दावा केला आहे. या यांत्रिक ‘जज’मुळे न्यायाधीशांवरील कामाचा ताण कमी होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
गरज पडल्यास न्याय देण्याच्या प्रक्रियेत मानवी न्यायाधीशांऐवजी अशा रोबोंचा वापर सुरु केला जाऊ शकतो. हे डेस्कटॉप संगणकाद्वारे वापरले जाऊ शकते आणि एकाच वेळी अब्जावधी गोष्टींचा डेटा यामध्ये संग्रहित करू शकतो. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकलानंतर हा जज आपला निर्णय सांगतो. यासाठी 2015 ते 2020 दरम्यानच्या हजारो कायदेशीर केसेस यासाठी वापरले गेले आहेत. ट्रेनिंगदरम्यान, या यांत्रिक जजने धोकादायक ड्रायव्हर्स, क्रेडिट कार्ड फसवणूक आणि जुगाराच्या प्रकरणांमध्ये अगदी योग्य निर्णय दिले होते.
यासोबतच शास्त्रज्ञांनी सांगितले की, पुढे जाऊन मशीन आणखी अद्ययावत केली जाणार आहे. काही काळानंतर हे मशीन निर्णय प्रक्रियेदरम्यान न्यायाधीशांच्या वतीने निर्णयही सुनावण्यास सक्षम असेल. असा दावाही केला जात आहे की, ही मशीन चिनी सरकारविरुद्ध ‘असहमती’ असणा-यांना लोकांची ओळखही करून देऊ शकते. (हेही वाचा: NASA करत आहे 24 धर्मगुरू व पुजाऱ्यांची नियुक्ती; एलियन्स शोधण्याच्या दिशेने मोठे पाऊल)
साऊथ चायना मॉर्निंग पोस्टशी बोलताना एका न्यायाधीशाने भीती व्यक्त केली की, यामध्ये 97 टक्के योग्य निर्णय घेण्याची क्षमता आहे, तिथे 3 टक्के चुकण्याची शक्यताही आहे. अशा स्थितीत चुकीचा निर्णय झाला तर त्याला जबाबदार कोण? न्यायाधीश जबाबदार असेल? मशीन? का एआय? या न्यायाधीशांनी सांगितले की, मशीन चुका शोधू शकते, परंतु निर्णय घेण्यासाठी त्याला माणसाच्या जागी ठेवता येणार नाही.