Porn Addiction In Amazon Tribe: ॲमेझॉन जंगलातील जमातीसाठी Elon Musk च्या स्टारलिंक उपलब्ध केले इंटरनेट; मात्र तरुणाईला लागले पॉर्न व्हिडिओ पाहण्याचे व्यसन
एलॉन मस्कने ॲमेझॉन रेनफॉरेस्टमधील या लोकांना स्टारलिंक उपग्रहांद्वारे इंटरनेट सुविधा उपलब्ध करून दिल्यानंतर, मारुबो जमातीला आता अश्लील व्हिडिओ पाहण्याचे आणि सोशल मीडियाचे व्यसन लागले आहे.
Porn Addiction In Amazon Tribe: जगभरात अशा अनेक जमाती आहेत, ज्या अजूनही मुख्य प्रवाहापासून दूर आहेत. जगाच्या नजरेपासून ते स्वतःला लपवून ठेवतात. यापैकी काहींचा बाह्य जगाशी थोडाफार संपर्क आहे, मात्र अजूनही अशा अनेक जमाती आहेत ज्यांना बाहेरील जगाची काहीही माहिती नाही. मोठमोठ्या एनजीओपासून ते देशाच्या सरकारपर्यंत अशा लोकांना मुख्य प्रवाहाशी जोडण्याचा प्रयत्न केला जातो, पण बहुतांश जमाती ते नाकारतात. अशा परिस्थितीत, जंगलांमध्ये त्यांना जीवनावश्यक वस्तू पुरवल्या जातात, जेणेकरून त्यांचे जीवन सुसह्य होईल.
अशीच एक जमात म्हणजे अमेझॉनच्या जंगलात राहणारी मारुबो ट्राइब्स (Marubo Tribe). त्यांचे जीवन सुसह्य आणि आधुनिक व्हावे म्हणून एलॉन मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीने त्यांना इंटरनेट उपलब्ध करून दिले, परंतु येथील लोकांनी गरज सोडून इतर काही कामांसाठीच इंटरनेट वापरण्यास सुरुवात केली.
एलॉन मस्कने ॲमेझॉन रेनफॉरेस्टमधील या लोकांना स्टारलिंक उपग्रहांद्वारे इंटरनेट सुविधा उपलब्ध करून दिल्यानंतर, मारुबो जमातीला आता अश्लील व्हिडिओ पाहण्याचे आणि सोशल मीडियाचे व्यसन लागले आहे. एवढेच नाही तर ब्राझीलमधील इटुई नदीच्या काठावर विखुरलेल्या वस्त्यांमध्ये राहणारे हे मारुबो आदिवासींचे स्थानिक लोक आता ऑनलाइन फसवणुकीचे बळी ठरत आहेत. (हेही वाचा: Japan : जन्मदर वाढवण्यासाठी टोकियो प्रशासन डेटिंग ॲप लॉन्च करण्याच्या तयारीत; नेमकं प्रकरण काय? घ्या जाणून)
सुरुवातीच्या काळात या जमातीतील लोकांनी इंटरनेटचा चांगला वापर केला आणि त्याचे महत्त्वही त्यांना समजले. त्यांना लगेच कळले की, इंटरनेटच्या माध्यमातून दूरवरूनही कुटुंब आणि मित्रांच्या संपर्कात राहता येते. पण हळूहळू इथल्या लोकांना आणखी एका समस्येने घेरले. इंटरनेटमुळे इथले लोक आळशी होऊ लागले. त्यांच्या समाजातील लोकांचा कामातील रस कमी होऊ लागला. इथल्या वृद्धांचे म्हणणे आहे की, तरुण लोक नेहमी फोनला चिकटलेले असतात. पॉर्न व्हिडिओसोबतच इन्स्टाग्रामसारख्या सोशल मीडिया साइटवर अश्लील कंटेंट पाहण्याचे व्यसन तरुणांना लागले आहे.
इथले 40 वर्षीय एनोके मारुबो यांनी न्यूयॉर्क टाइम्सच्या पत्रकारांना सांगितले की, इंटरनेटमुळे त्यांची दिनचर्या पूर्णपणे बदलत आहे. लोकांना काम करायचे नाही. तरुण लोकांनी शिकारीला, मासेमारीला जाणे बंद केले आहे. पॉर्नमुळे विशेषतः तरुण पुरुष आणि महिलांचे लैंगिक वर्तन बदलू लागले आहे. हे लोक आता ग्रुप चॅटमध्येही अश्लील फोटो आणि व्हिडिओ शेअर करत आहेत.