5.500 फुट उंचीवर चक्क झोपी गेला वैमानिक; 40 मिनिटे तसेच हवेत उडत राहिले विमान
अशा परिस्थितीमध्ये विमान थोडेथाटके नाही तर तब्बल 40 मिनिटे हवेत उडत होते
विमान प्रवास, हवेतील उड्डाणे याबाबत घडणाऱ्या अपघातांचे प्रमाण चांगलेच वाढले आहे. आवश्यक ती खबरदारी घेऊनही यावर नियंत्रण मिळवणे शक्य होत नाही. आता परत हलगर्जीपणामुळे एक अपघात होता होता टळला आहे. ऑस्ट्रेलियातील (Australia) अॅडलेड विमानतळ (Adelaide Airport) वरील नियंत्रित हवाई क्षेत्रात विमान उडवताना एक ट्रेनी पायलट चक्क झोपी गेला. अशा परिस्थितीमध्ये विमान थोडेथाटके नाही तर तब्बल 40 मिनिटे हवेत उडत होते. ऑस्ट्रेलियन ट्रान्सपोर्ट सेफ्टी ब्युरो (ATSB) ने ही अतिशय गंभीर घटना असल्याचे म्हटले आहे.
ATSB ने दिलेल्या माहितीनुसार या पायलटची आदल्या रात्री पूर्ण झोप नव्हती. सकाळी नाश्ता न करताच याने विमान उडवायला घेतले होते. दक्षिण ऑस्ट्रेलियामधील पोर्ट ऑगस्टा विमानतळ (Port Augusta Airport) ते पॅराफिल्ड विमानतळ (Parafield Airport) असा हा प्रवास होता. या प्रवासादरम्यान त्याला डोकेदुखीचा त्रास सुरु झाला, त्यामुळे त्याने विमान ऑटोपायलट मोडला टाकले आणि तो झोपी गेला. (हेही वाचा: विमानात पॉर्न क्लिप पाहत असल्याप्रकरणी उद्योगपती विरुद्ध महिलेची क्रु सदस्यांकडे तक्रार, आरोपीला अटक)
या अवस्थेत हे विमान 5.500 फुट उंचीवरून, 40 मिनिटे उडत होते. जेव्हा कोणतीही माहिती न देता हे विमान अॅडलेड विमानतळाच्या कक्षेत आले तेव्हा, नियंत्रकाने पायलटशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र तो झोपला असल्याने त्याच्याकडून कोणतेही उत्तर मिळाले नाही. त्यानंतर दुसऱ्या एका विमानाच्या मदतीने हा वैमानिक पॅराफिल्ड विमानतळावर सुखरूप परत आला. या घटनेनंतर खळबळ माजल्यावर, ATSB ने त्यांच्या नियमांमध्ये काही बदल केले आहेत. यामध्ये वैमानिकांची पूर्ण झोप व योग्य आहार यांचा समावेश करण्यात आला आहे.