UNSC India Membership: आंतरराष्ट्रीय सुरक्षा परिषदेत एण्ट्रीसाठी भारत सज्ज; पाकिस्तानला चिंता
भारताची कोणतीही चांगली गोष्ट पाकिस्तानला नेहमीच खूपत असते. सीमेवरही पाकिस्तान अनेकदा कारणाशिवाय कुरापती काढत असल्याचे अनेकदा स्पष्ट झाले आहे.
आंतरराष्ट्रीय सुरक्षा परिषद (United Nations Security Council) हंगामी सदस्यत्व मिळविण्यासाठी भारत सज्ज झाला आहे. भारताच्या या तयारीमुळे पाकिस्तान (Pakistan) केवळ अस्वस्थच नव्हे तर चिंतीतही झाला आहे. पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरैशी यांनी म्हटले आहे की, भारताचा यूएनएससी (UNSC) सदस्य बनणे हा पाकिस्तानसाठी चिंतेचा विषय आहे. कारण भारत या प्रतिष्ठीत फोरमच्या प्रस्तावांचे नेहमी उल्लंघन करत आला आहे. खास करुन कश्मीर मुद्द्यावर.
कुरैशी यांनी पुढे म्हटले आहे की, भारत प्रदीर्घ काळापासून यूएनएससी प्रस्तावांकडे दूर्लक्ष करत आहे. ज्यामुळे कश्मीरींना आत्मनिर्णय आणि अधिकारापासून वंचित रहावे लागत आहे. तिथल्या नागरिकांच्या हक्कावर गदा येत आहे. भारताच्या यूएनएससी सदस्य बनण्याने विशेष काही फरक पडणार नाही. कारण, पाकिस्तानही अनेकदा अशा प्रकारचा अस्थायी सदस्य बनला आहे.
काश्मीर प्रश्न उपस्थित करत कुरैशी यांनी म्हटले आहे की, गेल्या 5 ऑगस्टला भारताने कश्मीर अवैध मार्गाने विलिन करुन घेतले. जे कश्मीरी जनतेला अजिबात आवडले नाही. भारताने नागरिकता सुधारणा विधेयक आणून देशातील अल्पसंख्याक आणि खास करुन मुस्लिमांना निशाणा बनवले आहे, असेही पाकिस्तानने म्हटले आहे. (हेही वाचा, पाकिस्तानचे माजी पंतप्रधान युसूफ रझा गिलानी यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह)
पाकिस्तानची वरील वक्तव्ये पाहता सहज ध्यानात येते की भारताचे यूएनएससी सदस्य होणे पाकिस्तानच्या किती जिव्हारी लागले आहे. भारताची कोणतीही चांगली गोष्ट पाकिस्तानला नेहमीच खूपत असते. सीमेवरही पाकिस्तान अनेकदा कारणाशिवाय कुरापती काढत असल्याचे अनेकदा स्पष्ट झाले आहे.