Pakistan To Ban All Social Media Platforms: पाकिस्तानमध्ये तब्बल सहा दिवस सर्व सोशल मीडिया बंद राहणार; सरकारचा मोठा निर्णय, जाणून घ्या कारण

पंजाब सरकारने गुरुवारी रात्री उशिरा जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, मुख्यमंत्री मरियम नवाज यांच्या कायदा आणि सुव्यवस्थेवरील कॅबिनेट समितीने सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला.

Social Media | Representative Image (Photo Credits: Pixabay)

Pakistan To Ban All Social Media Platforms: आजकाल एकीकडे जगभरातील लोक सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांचे जोडले जात आहे, तर दुसरीकडे पाकिस्तानमध्ये सोशल मिडियावर बंदी घातली जाणार आहे. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील सरकारने मोहरम दरम्यान 'द्वेषपूर्ण कंटेंट’ नियंत्रित करण्याच्या उद्देशाने 'यूट्यूब', 'व्हॉट्सॲप', 'फेसबुक', 'इन्स्टाग्राम' आणि 'टिकटॉक' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घालण्यात येणार आहे. साधारण सहा दिवसांसाठी, 13 ते 18 जुलैपर्यंत ही बंदी घातली जाणार आहे. यापूर्वी पंजाब प्रांत सरकारने 'X' (पूर्वीचे ट्विटर) वर चार महिन्यांहून अधिक काळ बंदी घातली होती.

पंजाब सरकारने गुरुवारी रात्री उशिरा जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, मुख्यमंत्री मरियम नवाज यांच्या कायदा आणि सुव्यवस्थेवरील कॅबिनेट समितीने सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. यावेळी 'यूट्यूब', 'व्हॉट्सॲप', 'फेसबुक', 'इन्स्टाग्राम' आणि 'टिकटॉक' इत्यादींवर बंदी घालण्याची शिफारस केली गेली, जेणेकरून ‘द्वेषयुक्त कंटेंट आणि चुकीची माहिती’ नियंत्रित केली जाऊ शकेल आणि त्याद्वारे जातीय हिंसा टाळली जाऊ शकते. (हेही वाचा: Rishi Sunak यांनी दिला UK PM पदाचा राजीनामा; लवकरच Conservative Leader वरूनही होणार पायउतार)

पंजाब सरकारने सुरुवातीला 9 आणि 10 मोहरमला सोशल मीडिया प्लॅटफॉर्म बंद ठेवण्याचा विचार केला होता. कॅबिनेट मंत्री सय्यद आशिक हुसेन किरमाणी यांनी सांगितले की, मोहरमच्या काळात सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर, विशेषत: फेसबुकवर द्वेषयुक्त मजकूर टाकला जातो, यामुळे शत्रुत्व निर्माण होते आणि संपूर्ण वातावरण बिघडते. यामुळे सोशल मिडियावर बंदी घालणे आवश्यक आहे.

मरियम नवाज यांच्या नेतृत्वाखालील पंजाब सरकारने पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांना सहा दिवसांसाठी इंटरनेटवरील सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म निलंबित करण्याची सूचना जारी करण्याची विनंती केली आहे. पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांनी यापूर्वीच सोशल मीडियाला 'वाईट मीडिया' आणि 'डिजिटल दहशतवाद' म्हटले आहे. या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मशी लढा देण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली आहे. पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाक दार यांनीही अलीकडेच सोशल मीडियावर पूर्ण बंदी घालण्याची मागणी केली होती.