निर्बंध हटवा अन्यथा अणूबॉम्ब निर्मितीचा कार्यक्रम पुन्हा हाती घेऊ; उत्तर कोरियाचा अमेरिकेला इशारा

मात्र, अमेरिका आणि मित्र राष्ट्रांची कुटनिती कामी आली आणि उत्तर कोरियाने आपला अण्वस्त्रनिर्मिती कार्यक्रम मागे घेतला.

उत्तर कोरिया आणि अमेरिका यांच्यात तणाव (संग्रहित, संपादित आणि प्रतिकात्मक प्रतिमा)

गेली अनके महिने आपण आपला अण्वस्त्र बंदीचा उपक्रम थांबविला असल्याचा दावा करणाऱ्या उत्तर कोरियाने याच मुद्द्यावरुन महासत्ता अमेरिकेला कडक शब्दात इशारा दिला आहे. अमेरिकेसह जगभरातील इतर देशांच्या विनंतीवरुन आपण आपल्या अण्वस्त्र निर्मितीवर मर्यादा घातल्या. मात्र, तरीही उत्तर कोरियावर अमेरिकेने निर्बंध लादले आहेत. या निर्बंधावरुनच संतप्त झालेल्या उत्तर कोरियाने 'निर्बंध हटवा अन्यथा अणूबॉम्ब निर्मितीचा कार्यक्रम पुन्हा हाती घेऊ' अशी धमकी दिली आहे. अण्वस्त्र प्रकल्पावरुन गेली अनेक वर्षे, खास करुन गेल्या वर्षी अमेरिका आणि जगभरातील इतर अनेक देशांचे उत्तर कोरियाबरोबर संबंध ताणले गेले होते. मात्र, अमेरिका आणि मित्र राष्ट्रांची कुटनिती कामी आली आणि उत्तर कोरियाने आपला अण्वस्त्रनिर्मिती कार्यक्रम मागे घेतला.

विद्यमान वर्षातील एप्रिल महिन्यात उत्तर कोरियाचे हुकुमशाह किम जोंग-उन यांनी देशाची आण्विक गरज आणि क्षमता दोन्ही पूर्ण झाली आहेत. त्यामुळे सध्यास्थितीला या उपक्रमास स्थगिती देऊन समाजवादी अर्थव्यवस्था (Socialist Economy) उभारण्यासाठी उपक्रम राबविणार असल्याचे म्हटले होते. दरम्यान, उत्तर कोरियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने नुकतीच प्रतिक्रिया दिली आहे की, अमेरिकेने उत्तर कोरियावर लावलेले निर्बंध जर हटवले नाहीत तर, आम्ही पुन्हा प्योंगयांग निती (अण्वस्त्र कार्यक्रम) अवलंबू.

दरम्यान, विद्यमान वर्षातील जून महिन्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचे हुकुमशाह किम जोंग-उन यांच्यात ऐतिहासिक बैठक झाली. या वेळी उत्तर कोरियाने अण्वस्त्र निर्मितीच्या कार्यक्रमास पूर्णपणे स्थगिती दिल्याचे सांगितले. त्यानंतर कोरियाई द्विप्रकल्पातील तणाव दूर होईल अशी अटकळ बांधली जात होती. मात्र, अद्याप तरी त्यात कोणतीही अपेक्षीत अशी सुधारणा झाली नाही. (हेही वाचा, चीन-पाकिस्तान बससेवा सुरु करण्याचे उभय देशांचे प्रयत्न; भारताचा ठाम विरोध)

दुसऱ्या बाजूला अमेरिकेने उत्तर कोरियावरील आपले निर्बंध कायम ठेवले आहेत. अमेरिकेने हे निर्बंध कायम ठेवताना म्हटले आहे की, उत्तर कोरिया आपला अण्वस्त्रबंदीचा कार्यक्रम जोपर्यंत पूर्णपणे बंद करत नाही. तसेच, त्याची खात्री पटत नाही. तोपर्यंत हे निर्बंध कायम राहतील. अमेरिकेच्या या भूमिकेची उत्तर कोरियाकडून एक 'गँगस्टर' अशी संभावना केली जाते. तसेच, एकाच वेळी निर्बंध आणि चांगले संबंध या दोन्ही गोष्टी होऊ शकत नसल्याचेही उत्तर कोरियाने म्हटले आहे. गेल्याच महिन्यात उत्तर कोरियाने अमेरिकेवर दुहेरी चाल खेळण्याचा आरोप केला होता. अमेरिका उत्तर कोरियावर निर्बंध घालते आणि आर्थिक धोरणांवरही लक्ष ठेवते असा आरोप उ. कोरियाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने केला होता.