New Year 2021 Celebration in Wuhan: अनेक देशांमध्ये कोरोनाचे निर्बंध असताना, वूहान शहरात नवीन वर्षाच्या स्वागतासाठी हजारोंच्या संख्येने लोक एकत्र (Watch Video)
सध्या नवीन वर्षाच्या स्वागतादरम्यान हा विषाणू बळावू नये म्हणून प्रत्येक देश काळजी घेत असताना, या विषाणूचे उगमस्थान असलेल्या वूहानमध्ये मात्र सार्वजनिक ठिकाणी पार्टीची धूम दिसून येत आहे
एका वर्षापूर्वी साधारण याच कालावधीमध्ये वुहानच्या (Wuhan) हुबेई प्रांतात कोरोना विषाणूचा (Coronavirus) उद्रेक झाला होता. त्यानंतर हळू हळू हा विषाणू जगभर पसरला. सध्या जगात कोरोनाचे 83,260,611 रुग्ण आढळून आले असून, 18 लाखाहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. अजूनही जगभरात या विषाणूचे सावट असल्याने लोकांवर प्रचंड निर्बंध घातले गेले आहे. सध्या नवीन वर्षाच्या स्वागतादरम्यान हा विषाणू बळावू नये म्हणून प्रत्येक देश काळजी घेत असताना, या विषाणूचे उगमस्थान असलेल्या वूहानमध्ये मात्र सार्वजनिक ठिकाणी पार्टीची धूम दिसून येत आहे.
कोरोना विषाणू संकटामुळे यंदा भारतामध्ये सर्वच सण-उत्सव अगदी साधेपणाने साजरे झाले. सध्या नववर्षाच्या स्वागताला संपूर्ण जग सज्ज झाले असताना या काळात नवीन कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ नये म्हणून, अनेक देशांनी बरेच निर्बंध घातले आहेत. काही ठिकाणी लॉकडाऊन आहे. भारतामध्येही अनेक राज्यांमध्ये रात्र संचारबंदी लागू केली आहे. मात्र दुसरीकडे चीनच्या वूहानमध्ये सर्व काही सुरळीत चालू आहे. नववर्षाचे स्वागत करण्यासाठी वूहान शहरात मोठ्या संख्येने लोक एकत्र आले आहे. सध्या या गोष्टीचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.
या घडीला चीनमध्ये कोणतेही मोठे निर्बंध नसल्याने उर्वरित चीनसह वुहानमध्येही रेस्टॉरंट्स, पब आणि बार कार्यरत आहेत. यामुळे पार्टी करणाऱ्या लोकांना एकत्र येऊन नववर्षाचे स्वागत करण्यासाठी आयते कोलीत मिळाले आहे. सध्या असेच हजारोंच्या संख्येने लोक वूहानच्या रस्त्यावर एकवटलेले दिसून येत आहेत. (हेही वाचा: अमेरिकेत Pfizer ची लस घेतलेल्या नर्सला आठवड्यानंतर कोरोना विषाणूची लागण)
दरम्यान, वुहानमध्ये जगातील पहिला कोरोना विषाणूचा रुग्ण आढळला होता त्यानंतर 4 महिन्यांसाठी शहरात लॉकडाऊन व निर्बंध घालण्यात आले होते. या विषाणूमुले इथे 3,900 रुग्णांच्या मृत्यूची नोंद आहे. परंतु सात महिन्यांपूर्वी इथला लॉकडाऊन उचलल्यानंतर 10 मेपासून इथे नव्या कोरोना संसर्गाची नोंद झाली नाही.