'Mother Heroine': 10 किंवा त्यापेक्षा जास्त मुले असणाऱ्या मातांना मिळणार 13 लाखाचे बक्षीस; Vladimir Putin यांची मोठी घोषणा
2022 च्या सुरुवातीस 400,000 च्या घसरणीनंतर येथील एकूण लोकसंख्या 145.1 दशलक्ष झाली.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांनी 10 किंवा त्याहून अधिक मुले असलेल्या महिलांना सन्मानित करण्याचा निर्णय घेतला आहे. 10 किंवा त्याहून अधिक मुलांना जन्म देणाऱ्या महिलेला 'मदर हिरॉईन' (Mother Heroine) पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. रशिया-युक्रेन युद्धाच्या काळात झपाट्याने घटणारी लोकसंख्या पाहता हा निर्णय घेण्यात आला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या पुरस्कारासह मातांना एकरकमी $16,138 म्हणजेच साधारण 13 लाख रुपये दिले जातील.
या पुरस्कारासाठीची अट म्हणजे, 10 किंवा अधिक मुले जन्माला घालणारी आई रशियन फेडरेशनची नागरिक असणे आवश्यक आहे. याशिवाय एखाद्या आईने युद्ध, दहशतवादी हल्ला किंवा कोणत्याही आपत्कालीन स्थितीत आपले मूल गमावले असल्यास ती देखील या पुरस्काराची पात्र असेल. ‘मदर हिरोईन’ पुरस्काराची सुरुवात 1944 मध्ये माजी सोव्हिएत नेते जोसेफ स्टॅलिन यांनी केली होती.
दुसऱ्या महायुद्धात मोठ्या प्रमाणात लोकसंख्येच्या मृत्यूमुळे ही घोषणा करण्यात आली होती. मात्र, 1991 मध्ये सोव्हिएत युनियनच्या पतनानंतर मातांना हा पुरस्कार देणे बंद करण्यात आले. मदर हिरोईन अवॉर्ड हा 'हिरो ऑफ रशिया' आणि 'हिरो ऑफ लेबर' सारख्या पदव्यांप्रमाणे प्रतिष्ठेचा मानला जातो. 1 जून रोजी, रशियाच्या बालदिनाच्या उत्सवाच्या एक दिवस आधी, पुतिन यांनी मदर हिरोईन ही पदवी जाहीर करण्याची सूचना केली होती. (हेही वाचा: Canada: 'जोडीदाराच्या संमतीशिवाय Condom काढणे हा लैंगिक गुन्हा'; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय)
अलिकडच्या दशकात रशियाच्या लोकसंख्येमध्ये सातत्याने घट होत आहे. 2022 च्या सुरुवातीस 400,000 च्या घसरणीनंतर येथील एकूण लोकसंख्या 145.1 दशलक्ष झाली. याच कारणामुळे पुन्हा एकदा लोकसंख्या वाढवण्यासाठी रशियाचे अध्यक्ष पुतिन यांनी 'मदर हिरोईन' पुरस्कार सुरू केला आहे. जेणेकरून महिलांना अधिकाधिक मुले जन्माला घालण्यास प्रवृत्त करता येईल.