South Korea Plane Crash: दक्षिण कोरियात विमानाचा मोठा अपघात; लँडिंग करताना 181 प्रवाशांना घेऊन जाणारे विमान धावपट्टीवर घसरले, 28 जणांचा मृत्यू (Watch Video)
विमानात एकूण 181 लोक होते, ज्यात 175 प्रवासी आणि 6 क्रू मेंबर्स होते.
South Korea Plane Crash: दक्षिण कोरियात (South Korea) विमान अपघातात 28 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. जेजू एअरचे विमान लँडिंगच्या वेळी धावपट्टीवरून घसरले आणि क्रॅश (Plane Crash) झाले. विमानात एकूण 181 लोक होते, ज्यात 175 प्रवासी आणि 6 क्रू मेंबर्स होते. न्यूज एजन्सी योनहॅपच्या मते, दक्षिण कोरियाच्या मुआन आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Muan International Airport) एक विमान धावपट्टीवरून घसरले आणि क्रॅश झाले, ज्यामध्ये 23 जण गंभीर जखमी झाले. मुआन आंतरराष्ट्रीय विमानतळावर सध्या बचावकार्य सुरू आहे.
लँडिंगदरम्यान भिंतीवर आदळले -
मिळालेल्या माहितीनुसार, जेजू एअरचे हे विमान थायलंडहून परतत होते. दक्षिण कोरियातील मुआन विमानतळावर उतरताना विमान घसरले आणि भिंतीवर आदळले. भिंतीवर आदळताच विमानाने पेट घेतला. प्राथमिक माहितीनुसार या अपघातात 28 जणांचा मृत्यू झाला आहे. विमानाला लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी 32 फायर इंजिन आणि हेलिकॉप्टरही तैनात करण्यात आले होते. (हेही वाचा -Kazakhstan Plane Crash:अझरबैझान च्या Aktau Airport वर Baku-Grzony Flight J28243 झाले क्रॅश)
दक्षिण कोरियात विमानाचा मोठा अपघात, पहा व्हिडिओ -
लँडिंग गिअरमध्ये बिघाड -
प्राथमिक माहितीनुसार, लँडिंग गिअरमध्ये बिघाड झाल्यामुळे हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. राष्ट्रीय अग्निशमन यंत्रणेने सांगितले की, अपघातानंतर लागलेली आग जवळपास विझवण्यात आली आहे. वृत्त लिहेपर्यंत बचावकार्य सुरूच होते. विमानाच्या ढिगाऱ्यातून प्रवाशांना बाहेर काढले जात आहे. सध्या बचाव मोहिमेदरम्यान दोन जणांना जिवंत बाहेर काढण्यात आले आहे. त्यात एक प्रवासी आणि एका चालकाचा समावेश आहे.