Island of Gold: इंडोनेशियातील मच्छिमारांना सापडले 700 वर्षांपूर्वी गायब झालेले 'सोन्याचे बेट'; हाती लागला अब्जावधींचा खजिना
आता सापडलेल्या खजिन्यामध्ये सोन्याची अंगठी, नाणी आणि भगवान बुद्धाची अप्रतिम मूर्ती अशा अनेक गोष्टींचा समावेश आहे
जगातील अनेक रहस्यमयी ठिकाणी सोन्याचा खजिना असल्याचे तुम्ही कथांमध्ये ऐकत आला असाल, परंतु प्रत्यक्षात असे फार क्वचितच घडते. मात्र आता तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की इंडोनेशियातील (Indonesia) काही मच्छिमारांनी (Fishermen) 'सोन्याचे बेट' (Island of Gold) शोधून काढले आहे. गेली पाच वर्षे हे मच्छीमार खजिन्याच्या शोधात होते आणि अखेर त्यांना सोन्याचे बेट सापडले असून जिथे भरपूर खजिना असल्याचा दावा केला आहे. हा संपूर्ण खजिना अब्जावधी रुपयांचा असल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे ज्या बेटावर हा खजिना सापडला आहे त्या बेटाचे भारत देशाशी फार जुने नाते आहे.
शतकानुशतके दक्षिणपूर्व आशियातील इंडोनेशिया हा देश भारतीय संस्कृतीचा विस्तार मानला जातो. सुमात्रा बेटावर सातव्या ते 13 व्या शतकापर्यंत श्रीविजय राजवंशाचे राज्य होते. पेलांगबांगला या राजवंशाचे सुवर्ण बेट म्हटले जात असे. भारतीय चोल राजांनी येथे आक्रमण करून मौल्यवान खजिना लुटला होता आणि श्रीविजय वंशातील राजांना ओलीस ठेवले होते. परतताना हा खजिना गायब झाला होता. धोकादायक मगरींनी भरलेल्या पेलंगबंगच्या मुसी नदीत लोक त्याचा शोध घेत राहिले. आता जवळपास 700 वर्षांनंतर मच्छिमारांना श्रीविजय साम्राज्यातील मौल्यवान खजिना सापडला आहे. सागरी संशोधक डॉ. शॉन किंग्सले यांच्या मते, सुमात्राच्या हरवलेल्या गोल्डन बेटाचा हा शोध आहे.
इतिहासकारांच्या मते, सुमात्राच्या श्रीविजय राजवंशाचा प्रसार भारताच्या पूर्व किनारपट्टी आणि दक्षिण चीन महासागरापर्यंत होता. पूर्वी येथे सापडलेली भारतीय आणि चिनी नाणी याचा पुरावा आहेत. आंतरराष्ट्रीय जलक्षेत्रात श्रीविजय घराण्याची छत्री होती. येथे बौद्ध आणि हिंदू धर्माच्या मूर्तीही सापडल्या आहेत. पुढे हा वंश जावाच्या मलायूपुरता मर्यादित राहिला. (हेही वाचा: Pumpkin: तब्बल 10 क्विंटल वजनाचा जगातील सर्वात मोठा भोपळा, जागतिक विक्रमाची नोंद)
श्रीविजय काळात मंदिरे ही ब्राँझने बांधली जात असत व त्यामध्ये शुद्ध सोन्यापासून बनवलेल्या बुद्धाच्या मूर्ती स्थापित केल्या जात असत. आता सापडलेल्या खजिन्यामध्ये सोन्याची अंगठी, नाणी आणि भगवान बुद्धाची अप्रतिम मूर्ती अशा अनेक गोष्टींचा समावेश आहे. फक्त या मूर्तीचीच किंमत करोडोंच्या घरात असल्याचे सांगितले जात आहे. श्रीविजय साम्राज्याबद्दल अनेक कथा प्रसिद्ध आहेत. आता समोर आले आहे की,म श्रीविजयाचे साम्राज्य काल्पनिक नव्हते. येथे बौद्ध भिक्खू राहत होते आणि राजधानीत 20 हजारांहून अधिक सैनिक होते. हे पृथ्वीवरील शेवटचे राज्य होते जे अचानक नाहीसे झाले.