Iran Anti Hijab Protests: इराणमध्ये हिजाबविरोधी निदर्शने, उफाळला हिंसाचार; 41 जणांचा मृत्यू, 700 जणांना अटक
मझांदरन आणि गिलान प्रांतात सर्वाधिक मृत्यू झाल्याचा दावाही अधिकार गटांनी केला आहे.
इराणमध्ये (Iran) पोलीस कोठडीत एका तरुणीच्या मृत्यूवरून देशात मोठी निदर्शने आणि हिंसाचार सुरु आहे. या निदर्शनेमध्ये 41 जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर 60 महिलांसह 700 हून अधिक जणांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत शेकडो अधिकार कार्यकर्ते आणि पत्रकारांनाही अटक करण्यात आली आहे. इराण सरकारच्या म्हणण्यानुसार, निदर्शकांनी सार्वजनिक आणि खाजगी मालमत्तेला आग लावली. इराणच्या कुख्यात नैतिकता पोलिसांनी हिजाब नीट न घातल्याच्या आरोपाखाली अटक केल्यानंतर, महसा अमिनी या 22 वर्षीय कुर्दिश मुलीचा कोठडीत मृत्यू झाला आहे.
इराण ह्युमन राइट्स नावाच्या ओस्लो-आधारित अधिकार गटाचा दावा आहे की सुरक्षा कर्मचारी वगळता मृत्यूंची संख्या 54 आहे. मझांदरन आणि गिलान प्रांतात सर्वाधिक मृत्यू झाल्याचा दावाही अधिकार गटांनी केला आहे. वेब मॉनिटर नेटब्लॉक्सनुसार (वृत्तसंस्था एएफपीने अहवाल दिल्याप्रमाणे), या हिंसाचारादाराम्यान, इराणच्या राजवटीने व्हॉट्सअॅप, स्काईप, लिंक्डइन आणि इंस्टाग्राम सारख्या कम्युनिकेशन प्लॅटफॉर्मवरही बंदी घातली आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओ आणि फोटोंमध्ये तेहरान तसेच देशातील इतर शहरांमधील आंदोलक सरकारच्या कठोर कायद्यांचा निषेध करताना दिसत आहेत. सोशल मीडियावरील काही व्हिडीओमध्ये महिलादेखील सामूहिकपणे देशातील कायद्यांचा विरोध करताना दिसत आहेत. काही व्हिडीओमध्ये ते त्या हिजाब जळताना दिसत आहेत.
इराणमध्ये सुरू झालेली निदर्शने इतर देशांमध्येही पसरली आहेत. बाहेरील देशातील शेकडो इराणींनी आंदोलकांवर सरकारच्या कारवाईचा आणि त्याच्या कडक हिजाब कायद्याचा निषेध करण्यासाठी अनेक युरोपियन शहरांमध्ये रॅली काढली आहे. हिजाबविरोधी निदर्शने इराणमधील 30 हून अधिक शहरांमध्ये पसरली आहेत. अध्यक्ष इब्राहिम राहीसी यांनी शनिवारी पोलिसांना नवे कडक आदेश दिले. (हेही वाचा: कॅनडा मधील भारतीय विद्यार्थी, पर्यटकांना 'सतर्क' राहण्याच्या केंद्र सरकारच्या सूचना; जाणून घ्या यामागील नेमकं कारण)
दरम्यान, इराणच्या सरकारने तेहरानसह देशातील 20 प्रमुख विद्यापीठे बंद करण्याची आणि ऑनलाइन वर्ग चालवण्याची घोषणा केली आहे. मात्र आता इंटरनेटशिवाय वर्ग घेताना विद्यार्थ्यांना अडचणी येत आहेत. इराणमध्ये शुक्रवारपासूनच दोन वर्षांनी नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाले आहे.