Indian Pilgrims in Israel: धार्मिक यात्रेसाठी जाणारे भारतीय यात्रेकरू इस्रायलमध्ये होत आहे 'गायब'; जाणून घ्या नक्की काय घडत आहे

यातील बहुतांश लोक केरळचे रहिवासी आहेत. याबाबत टूर कंपन्यांकडून प्राप्त झालेले तपशील एका खास पॅटर्नकडे निर्देश करतात.

Israel (Photo Credit : Pixabay)

भारतातून दरवर्षी हजारो लोक इस्रायलला (Israel) धार्मिक यात्रेसाठी जातात. यातील बहुतेक लोक जेरुसलेम किंवा व्याप्त पॅलेस्टाईनमध्ये जातात. मात्र हे लोक तिथे पोहोचताच गायब होत आहेत. भारतीय ‘यात्रेकरू’ बेपत्ता झाल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. त्यामुळे धार्मिक यात्रेसाठी आलेले भारतीय भाविक इथे नक्की कुठे जात आहेत? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

मिडल ईस्ट आयच्या अहवालानुसार, अलिकडच्या वर्षांत भारतीय यात्रेकरूंनी इस्त्राईल आणि पॅलेस्टाईनमध्ये स्थायिक होण्यासाठी आणि तिथे रोजगार मिळविण्यासाठी ‘तीर्थयात्रे’च्या कारणाचा वापर केला आहे. इस्रायल-पॅलेस्टाईनमध्ये ख्रिश्चन, यहुदी आणि इस्लाम धर्माशी संबंधित तीर्थक्षेत्रे आहेत. यामध्ये जेरुसलेम हे शहर सर्वात पवित्र आहे, ज्याला ख्रिश्चन, ज्यू आणि इस्लाम या तिन्ही धर्मांमध्ये खूप महत्त्व आहे.

मार्च महिन्यापासून इस्रायलमध्ये धार्मिक यात्रेदरम्यान डझनभर भारतीय यात्रेकरू बेपत्ता झाले आहेत. यातील बहुतांश लोक केरळचे रहिवासी आहेत. याबाबत टूर कंपन्यांकडून प्राप्त झालेले तपशील एका खास पॅटर्नकडे निर्देश करतात. बेपत्ता झालेल्या लोकांनी इस्रायलमध्ये आश्रय किंवा रोजगार मिळवल्याचे मानले जात आहे. म्हणजेच इस्रायलमध्ये रोजगार हवा असलेले लोक धार्मिक यात्रेचे कारण सांगून इथे येतात व काम मिळवतात.

रोजगारासाठी इस्रायलची निवड करण्यामागे अनेक कारणे आहेत. मध्यपूर्वेतील हा देश एक विकसित देश आहे, जिथे रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध आहेत. मात्र, धार्मिक दौऱ्याच्या नावाखाली इस्रायलला पोहोचणारे बहुतांश लोक हे कमी कौशल्याचे काम करणारे आहेत. हे लोक केअर सेंटरमध्ये मदत करणे, घरकाम,  दुकानांमध्ये काम करणे अशा रोजगारावर आहेत. इस्रायलचे चलनही भारतापेक्षा मजबूत आहे, त्यामुळे त्यांना भरघोस पगाराच्या रूपात लाभ मिळत आहे.

याबाबत हैदराबाद विद्यापीठामधील इतिहासाचे सहयोगी प्राध्यापक व्हीजे वर्गीस हे केरळमधील आंतरराष्ट्रीय स्थलांतराचा अभ्यास करत आहेत. ते म्हणतात, इस्रायल हे अनेक कारणांमुळे लोकांमध्ये रोजगारासाठी लोकप्रिय ठिकाण बनत आहे. इस्रायल भारताच्या 'इमिग्रेशन चेक रिक्वायर्ड' (ECR) देशांच्या यादीत आहे. कोणत्याही देशात नोकरीसाठी जाण्यापूर्वी भारतातच ECR ची मंजुरी घ्यावी लागते. जर तुम्ही परदेशात नोकरी करणार असाल, तर भारतातील 'ऑफिस ऑफ प्रोटेक्टर ऑफ इमिग्रेशन' (POE) तुमची तपासणी करेल आणि तुम्ही तिथे जाऊ शकता की नाही हे सांगेल. प्रोफेसर वर्गीस यांनी निदर्शनास आणून दिले की, 17 इतर देशांप्रमाणे, भारतीयांना इस्रायलमध्ये काम करण्यासाठी POE मंजूरीची आवश्यकता नाही. तिथे चांगली मजुरी मिळते आणि तुलनेने चांगल्या कामाच्या परिस्थिती देखील आहेत. त्यामुळे लोक धार्मिक यात्रेच्या नावाखाली तिथे जात आहेत.