India Withdraws Envoy, Diplomats in Canada: 'ट्रूडो सरकारवर विश्वास नाही'; भारताने कॅनडातून उच्चायुक्त आणि इतर राजनैतिक अधिकाऱ्यांना परत बोलावले

परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, कॅनडातील भारतीय उच्चायुक्त आणि इतर राजनयिकांना निराधार लक्ष्य करणे अस्वीकार्य आहे. सोमवारी संध्याकाळी भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, ‘ट्रूडो सरकारच्या वृत्तीमुळे भारतीय राजनैतिक अधिकाऱ्यांची सुरक्षा धोक्यात आली आहे.’

Narendra Modi and Justin Trudeau (Photo Credits: ANI and Wikimedia Commons)

India Withdraws Envoy, Diplomats in Canada: भारताने कॅनडातून (Canada) आपले उच्चायुक्त संजय कुमार वर्मा आणि इतर राजनैतिक अधिकाऱ्यांना परत बोलावण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबतच भारताने दिल्लीतील कॅनडाच्या उच्चायुक्तांनाही समन्स पाठवले आहेत. सोमवारी भारताने कॅनडाकडून आलेले 'डिप्लोमॅटिक कम्युनिकेशन' पूर्णपणे नाकारले. कॅनडाने भारतासोबत सामायिक केलेल्या 'डिप्लोमॅटिक कम्युनिकेशन'मध्ये, कॅनडातील भारताचे उच्चायुक्त संजय कुमार वर्मा आणि इतर भारतीय मुत्सद्दींवर, जून 2023 मध्ये खलिस्तान समर्थक कार्यकर्ते हरदीप सिंग निज्जर याच्या हत्येमध्ये सहभाग असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

कॅनडाच्या या भूमिकेवर निषेध व्यक्त करत भारताने दिल्लीतील कॅनडाच्या वरिष्ठ मुत्सद्दीला बोलावले आहे. परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, कॅनडातील भारतीय उच्चायुक्त आणि इतर राजनयिकांना निराधार लक्ष्य करणे अस्वीकार्य आहे. सोमवारी संध्याकाळी भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, ‘ट्रूडो सरकारच्या वृत्तीमुळे भारतीय राजनैतिक अधिकाऱ्यांची सुरक्षा धोक्यात आली आहे.’

भारताने पुढे म्हटले आहे, सध्याच्या कॅनडामधील सरकारवर आमचा विश्वास नाही. या पार्श्वभूमीवर भारत सरकारने कॅनडातून आपले उच्चायुक्त आणि इतर राजनैतिक अधिकाऱ्यांना परत बोलावण्याचा निर्णय घेतला आहे. भारताने कॅनडाला सांगितले आहे की, ट्रूडो सरकार भारताविरुद्ध ज्याप्रकारे फुटीरतावाद आणि अतिरेक्यांना समर्थन देत आहे त्याविरुद्ध प्रतिक्रिया देण्याचा अधिकार भारताला आहे. निज्जर हत्याकांडातील भारतीय उच्चायुक्तांच्या नावावर भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने तीव्र आक्षेप व्यक्त केला आहे.

भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘आम्हाला रविवारी कॅनडाकडून 'डिप्लोमॅटिक कम्युनिकेशन' प्राप्त झाले. कॅनडात सुरू असलेल्या हरदीप सिंग निज्जर हत्या तपासात भारतीय उच्चायुक्त आणि इतर मुत्सद्दींचा सहभाग समोर आल्याचे सांगण्यात आले आहे. भारत सरकार हे बिनबुडाचे आरोप ठामपणे नाकारते. व्होट बँक तयार करण्यासाठी कॅनडाचे ट्रूडो सरकार मुद्दाम हे करत आहे. (हेही वाचा: Pakistan SCO Summit: एससीओ शिखर परिषदेसाठी पाकिस्तानची इस्लामाबाद, रावळपिंडी शहरे झाली सील; पाच दिवस व्यवसाय, रेस्टॉरंट्स, लग्नाचे हॉल, कॅफे, शाळा बंद)

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने कॅनडातील भारतीय उच्चायुक्त संजय कुमार वर्मा यांचा बचाव करताना म्हटले आहे की, ‘वर्मा हे वरिष्ठ सेवारत मुत्सद्दी आहेत. त्यांची 36 वर्षांची कारकीर्द आहे. ते जपान आणि सुदानमध्ये भारताचे राजदूत राहिले आहेत. याशिवाय वर्मा यांनी इटली, तुर्किये, व्हिएतनाम आणि चीनमध्येही सेवा बजावली आहे. त्याच्यावर असे आरोप करणे हास्यास्पद आणि अवमानकारक आहे.’ हरदीपसिंग निज्जर याची गेल्या वर्षी 18 जून रोजी अज्ञात हल्लेखोरांनी हत्या केली होती. यानंतर, गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये, जस्टिन ट्रूडो यांनी नवी दिल्ली येथे झालेल्या G-20 शिखर परिषदेत भाग घेण्यापूर्वी, हाऊस ऑफ कॉमन्समध्ये निज्जरच्या हत्येत भारतीय एजंटचा हात असल्याचे सांगितले होते. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी हरदीपसिंग निज्जर यांच्या हत्येचा आरोप करत भारतातील सर्वोच्च राजनयिकाची हकालपट्टी केली होती.