Uber Eats ने रचला इतिहास; पहिल्यांदाच पृथ्वीवरून अंतराळात अन्नाची झाली डिलिव्हरी, जपानी अब्जाधीशाने बजावली डिलिव्हरी बॉयची भूमिका (Watch Video)

युसाकू कंपनीच्या नावाची बॅग घेऊन अंतराळात गेले होते, यामध्येच खाद्यपदार्थ पॅक केले होते. त्यांनी उबर इट्सच्या कर्मचाऱ्यांचा गणवेश परिधान केला होता

Uber Eats (संग्रहित संपादित प्रतिमा)

उबरने 2014 मध्ये उबर इट्स (Uber Eats) नावाचे ऑनलाइन फूड ऑर्डरिंग आणि डिलिव्हरी प्लॅटफॉर्म लाँच केले. अल्पावधीतच हे प्लॅटफॉर्म अतिशय लोकप्रिय झाले व सध्या तब्बल 32 देशांमध्ये ते कार्यरत आहे. या प्लॅटफॉर्मद्वारे ऑर्डर केलेल्या अन्नाची कार, स्कूटर, बाईक किंवा अगदी पायी डिलिव्हरी केली जाते. आता उबर इट्सने नवा इतिहास रचला आहे. उबर इट्सने पृथ्वीच्या बाहेर अंतराळात अन्नाची डिलिव्हरी केली आहे. असे करणारी ही पहिली कंपनी ठरली आहे.

आपल्या या कामगिरीचा एका व्हिडिओ उबर इट्सने शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, उबर इट्सचा डिलिव्हरी बॉय आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) अन्नाची डिलिव्हरी करत आहे. दुसरीकडे ही इतिहासातील सर्वात महागडी अन्नाची डिलिव्हरी ठरली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही ऐतिहासिक कामगिरी जपानी अब्जाधीश युसाकू माएझावा (Yusaku Maezawa) यांनी आपल्या नावावर केली. त्यांनी डिलिव्हरी बॉयची भूमिका पार पाडली.

11 डिसेंबर रोजी सुमारे 9 तासांच्या रॉकेट प्रवासानंतर युसाकू आयएसएसवर पोहोचले, तेथे त्यांनी 9:40 EST वाजता अन्न वितरित केले. आयएसएस कमांडर अँटोन श्कापलेरोव्ह यांना ही अन्नाची बॅग सोपवण्यात आली. 8 डिसेंबर रोजी हे खास अन्न अंतराळवीरांसाठी तयार करण्यात आले होते. ट्रॅव्हल अँड लीझरमधील एका अहवालात नमूद केले आहे की, या फूड पॅकेजमध्ये Miso मधील Mackerel Simmered, चिकन, बांबू शूट, ब्रेझ्ड पोर्क, जपानी बीफ बाऊल यांचा समावेश होता. (हेही वाचा: NASA Creates History: नासाचे अंतराळयान Parker Solar Probe ने केला सूर्याला स्पर्श; इतिहासात पहिल्यांदाच घडली अशी घटना)

अंतराळवीरांना हे अन्न खाता यावे यासाठी अगदी मानकांनुसार ते बनवण्यात आले होते. युसाकू कंपनीच्या नावाची बॅग घेऊन अंतराळात गेले होते, यामध्येच खाद्यपदार्थ पॅक केले होते. त्यांनी उबर इट्सच्या कर्मचाऱ्यांचा गणवेश परिधान केला होता. युसाकू जवळपास 12 दिवस ISS मध्ये व्यतीत करणार आहेत.