Hamas Lost Control In Gaza: हमासने गमावले गाझारील नियंत्रण; इस्रायली संरक्षण मंत्र्यांचा दावा
पॅलेस्टिनी गटाने इस्रायलवर 500 हून अधिक रॉकेट प्रक्षेपित करून "आश्चर्यजनक" हल्ला सुरू केल्यानंतर एका महिन्यामध्ये एक महत्त्वपूर्ण घडामोड (Hamas Lost Control In Gaza) घडत असल्याचे पुढे येत आहे.
Israeli On Hamas: हमासने (Hamas) "गाझामधील नियंत्रण गमावले आहे, असा दावा इस्रायलच्या संरक्षण मंत्र्यांनी सोमवारी (13 नोव्हेंबर) केला आहे. पॅलेस्टिनी गटाने इस्रायलवर 500 हून अधिक रॉकेट प्रक्षेपित करून "आश्चर्यजनक" हल्ला सुरू केल्यानंतर एका महिन्यामध्ये एक महत्त्वपूर्ण घडामोड (Hamas Lost Control In Gaza) घडत असल्याचे पुढे येत आहे. इस्रायलच्या मुख्य टीव्ही स्टेशन्सवर प्रसारित केलेल्या व्हिडिओमध्ये, संरक्षण मंत्री म्हणाले, "हमासने गाझावरील नियंत्रण गमावले आहे. दहशतवादी दक्षिणेकडे पळून जात आहेत. नागरिक हमासच्या तळांना लुटत आहेत. स्थानिक नागरिकांचा तेथील सरकारवर विश्वास राहिला नसल्याचा दावाही संरक्षण मंत्र्यांनी केला आहे. दरम्यान, या दाव्याच्या समर्थनांर्थ कोणतेही ठोस पुरावे त्यांनी दिले नाहीत.
हमासच्या सैनिकांनी इस्रायलच्या लष्करी सीमारेषेचा भंग केला तेव्हा मोठा उद्रेक झाला. हा संघर्ष साधारण 7 ऑक्टोबर पासून सुरु झाला. ज्याला अलिकडील काळातील सर्वात क्तरंजित गाझा युद्ध म्हणून ओळखले गेले. ताज्या इस्रायली आकडेवारीनुसार, संघर्षात सुमारे 1,200 लोक मारले गेले. तर सुमारे 240 लोकांना हमासने ओलिस बनवले. हमास संचालित गाझा पट्टीमधील उप आरोग्य मंत्री युसुफ अबू रीश यांनी म्हटले की, उर्जेच्या कमतरतेमुळे प्रदेशाच्या उत्तरेकडील सर्व रुग्णालये "सेवेबाहेर" आहेत. अबू रिश यांनी खुलासा केला की गाझामधील सर्वात मोठी वैद्यकीय सुविधा असलेल्या अल-शिफा रुग्णालयात अलिकडच्या दिवसांत सात बाळे आणि 27 रुग्णांचा अकाली मृत्यू झाला आहे.
गाझा पट्टीला इस्त्रायली सैनिकांनी वेढा दिला आहे. परिणामी रसद तुटल्याने गाझा अन्न, इंधन आणि अत्यावश्यक वस्तूंच्या तुटवड्याने झगडत आहे. पॅलेस्टाईनचे पंतप्रधान मोहम्मद शतायेह यांनी सोमवारी युरोपियन युनियन आणि संयुक्त राष्ट्रांना गाझामध्ये "पॅराशूट मदत" करण्याचे आवाहन केले. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी अमेरिकन मीडियाला दिलेल्या मुलाखतीदरम्यान गाझामध्ये हमासने ओलिस ठेवलेल्यांना मुक्त करण्यासाठी संभाव्य कराराचे संकेत दिले. तथापि, नेतन्याहू यांनी योजना धोक्यात येण्याचे कारण देत तपशील देण्याचे टाळले.
नागरिकांना जखमी करणाऱ्या टँक-विरोधी क्षेपणास्त्राला प्रत्युत्तर म्हणून इस्रायली सीमेजवळ इस्रायली लढाऊ विमानांनी रविवारी दक्षिण लेबनॉनमधील हिजबुल्लाच्या अड्ड्यांवर हल्ले केले. दक्षिण लेबनॉनमधील इतर गटांसह इस्रायल आणि इराण-समर्थित हिजबुल्लाह यांच्यातील संघर्ष ऑक्टोबर 8 पासून वाढला आहे. जवळपास दररोजच्या युद्धामुळे प्रादेशिक संघर्षाची भीती वाढली आहे. या संघर्षाकडे अवघ्या जगाचे लक्ष लागले आहे. या संघर्षाचा भडका जगभर होऊ नये यासाठी शांततावादी देश प्रयत्नशील आहेत.