Greece Boat Tragedy: ग्रीसमध्ये शेकडो प्रवाशांना घेऊन जाणारे जहाज बुडाले; 300 पाकिस्तानी लोकांच्या मृत्यूची भीती, पीएम शाहबाज शरीफ यांनी घोषित केला राष्ट्रीय शोक

युनायटेड नेशन्स (आंतरराष्ट्रीय स्थलांतरण संस्था) च्या एजन्सीनुसार, 14 जून रोजी ग्रीसजवळ बोट पलटण्याची दुर्घटना 2015 नंतरची सर्वात मोठी दुर्घटना आहे. 2015 मध्ये लिबियाहून इटलीला जाणारी बोट उलटून 1100 जणांचा मृत्यू झाला होता.

Death | Representative Photo (Photo Credit: PTI)

Greece Boat Tragedy: शेकडो प्रवाशांना घेऊन जाणारे जहाज बुधवारी (14 जून) ग्रीसमधील (Greece) पायलोस या किनारपट्टीच्या शहरापासून 80 किमी अंतरावर बुडाले. या अपघातात शेकडो लोकांचा मृत्यू झाला असून त्यात मोठ्या प्रमाणात पाकिस्तानी नागरिकांचा समावेश आहे. ग्रीस बोट दुर्घटनेत सुमारे 500 लोक बेपत्ता झाल्याची भीती आहे. द गार्डियनच्या वृत्तानुसार, वाचलेल्या पाकिस्तानी लोकांनी कोस्टल सिक्युरिटीला सांगितले की, त्यांना जहाजाच्या सर्वात खालच्या भागात बसण्यास भाग पाडले गेले.

जहाजात, जिथे पाकिस्तानी लोक खालच्या भागात बसले होते, तिथे इतर देशांच्या लोकांना वर बसण्याची परवानगी होती. पुरावे असे सूचित करतात की वर बसलेल्यांना जगण्याची जास्त शक्यता असते, तर खाली बसलेल्यांना बुडण्याची शक्यता जास्त असते. महिला आणि मुलांना जबरदस्तीने जहाजावर कोंडून ठेवण्यात आल्याची माहिती तपासकर्त्याने दिली. अपघातावेळी जहाजावर सुमारे 750 लोक होते. या दुर्घटनेत फक्त 78 जण वाचले आहेत आणि जवळपास 500 अजूनही बेपत्ता असल्याची भीती आहे.

बुधवारी पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास जहाज बुडण्यास सुरुवात झाली. जहाज अपघातामध्ये बुडून बचावलेल्यांमध्ये एकही महिला आणि लहान मुले नव्हती. पायलोस द्वीपकल्पातील जहाजाच्या दुर्घटनेत शेकडो पाकिस्तानी मरण पावले असल्याचे पाकिस्तानकडून मिळालेल्या वृत्तांतून दिसून आले आहे. या बोट दुर्घटनेत सुमारे 298 पाकिस्तानी लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती स्थानिक माध्यमांनी दिली आहे. एका अहवालानुसार या जहाजात सुमारे 400 पाकिस्तानी होते. पाकिस्तानच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, वाचलेल्या 78 पैकी फक्त 12 पाकिस्तानचे आहेत.

पाकिस्तानची न्यूज वेबसाईट डॉनने दिलेल्या माहितीनुसार, बोटीत पाकिस्तानचे 400, इजिप्तचे 200, सीरियाचे 150 लोक होते. या अपघातात पाकिस्तानी नागरिकांच्या मृत्यूबद्दल पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी शोक व्यक्त केला आहे. ते म्हणाले, ‘मानवी तस्करांवर कठोर कारवाई केली जाईल. हा जघन्य गुन्हा आहे.’ यानंतर पाकिस्तानने पीओकेमधून 9 मानवी तस्करांना अटक केली आहे. त्यांच्यावर अवैध मार्गाने पाकिस्तानातील लोकांना युरोपात नेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाल्याबद्दल पाकिस्तानमध्ये आज राष्ट्रीय शोक पाळण्यात आला आहे.

युनायटेड नेशन्स (आंतरराष्ट्रीय स्थलांतरण संस्था) च्या एजन्सीनुसार, 14 जून रोजी ग्रीसजवळ बोट पलटण्याची दुर्घटना 2015 नंतरची सर्वात मोठी दुर्घटना आहे. 2015 मध्ये लिबियाहून इटलीला जाणारी बोट उलटून 1100 जणांचा मृत्यू झाला होता. ट्युनिशियाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, 2023 च्या पहिल्या 3 महिन्यांत त्यांनी बेकायदेशीरपणे युरोपमध्ये जाणाऱ्या 13,000 स्थलांतरित बोटींना अटक केली आहे. 14 जून रोजी बुडालेल्या बोटीचे नाव लकी सेलर असल्याचे सांगण्यात येत आहे. (हेही वाचा: Nigeria Boat Accident: नायजेरियात लग्नाच्या पाहुण्यांना घेऊन जाणारी बोट उलटली; तब्बल 105 जणांचा मृत्यू- Reports)

ग्रीसजवळ बोट दुर्घटनेनंतर तेथील तटरक्षकांवर निष्काळजीपणाचा आरोप होत आहे. बोट बुडाण्यापूर्वी अनेक तास ती एकाच जागी उभी राहिल्याचे बीबीसीच्या रिपोर्टमध्ये समोर आले आहे. ग्रीसच्या तटरक्षकांचे म्हणणे आहे की, बोट सतत पुढे जात होती, त्यामुळे त्यांना कोणताही धोका जाणवला नाही. त्याचवेळी, बोटीच्या मालकाने सांगितले की, बोट बुडण्याच्या धोक्याच्या वेळी तटरक्षक दलाशी संपर्क साधला होता. लॉग बुकमधूनही याची पुष्टी केली जात आहे. मात्र, बोटीमध्ये खाद्यपदार्थ आणि पिण्याचे पाणी देऊन तटरक्षक दलाचे हेलिकॉप्टर परतले.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now