G7 Summit in Brussels: ब्रुसेल्समध्ये 24 मार्च ला होणार G-7 समूह शिखर परिषद; रशिया-युक्रेन युद्धावर होणार चर्चा

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, G-7 शिखर परिषदेचे नेतृत्व अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन करणार आहेत.

G7 Summit (PC - Twitter)

G7 Summit in Brussels: रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाने गंभीर स्वरूप धारण केले आहे. चर्चेच्या अनेक फेऱ्या होऊनही दोन्ही देशांमध्ये युद्ध सुरूच आहे. जर्मनीने शुक्रवारी जाहीर केले की, 24 मार्च रोजी ब्रुसेल्स येथे होणाऱ्या शिखर परिषदेदरम्यान G-7 समूह शिखर परिषद रशियाच्या युक्रेनवरील आक्रमणावर चर्चा करेल. दरम्यान, नाटोच्या तातडीच्या शिखर परिषदेत रशियाच्या युक्रेनमध्ये सुरू असलेल्या आक्रमकतेबाबतच्या उपाययोजनांवरही चर्चा होणार आहे.

G-7 च्या परराष्ट्र मंत्र्यांनी गुरुवारी भेट घेतली. या भेटीत त्यांनी रशियावर दबाव ठेवण्यास आणि युक्रेनला अधिक मानवतावादी मदत देण्याचे मान्य केले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, G-7 शिखर परिषदेचे नेतृत्व अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन करणार आहेत. Nikkei Asia च्या अहवालानुसार, G-7 गटाचे नेते रशिया आणि बेलारूस विरुद्ध अतिरिक्त निर्बंध आणि इतर उपायांवर चर्चा करण्याची शक्यता आहे. ते कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींसह ऊर्जा बाजार कसे स्थिर ठेवता येईल यावरही विचार विनिमय करतील. (हेही वाचा - Russia-Ukraine War: मृत्यूच्या 3 आठवड्यांनंतर घरी पोहोचणार भारतीय विद्यार्थी Naveen Shekharappa चा मृतदेह; वडिलांनी घेतला मृतदेह दान करण्याचा निर्णय)

युक्रेनला वाढती मदत आणि युक्रेनियन निर्वासितांना स्वीकारणाऱ्या शेजारील देशांना पाठिंबा देणे हेही अजेंड्यावर असण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. निक्केई एशियाच्या अहवालानुसार, जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा मॉस्कोविरुद्धच्या जपानच्या भूमिकेबाबत रशियावर आर्थिक दबाव वाढवण्याच्या त्यांच्या सरकारच्या धोरणाचे स्पष्टीकरण देतील.

राजनैतिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, किशिदा बेल्जियमच्या राजधानीलाही भेट देणार आहेत. 24 फेब्रुवारी रोजी G-7 च्या नेत्यांनी आभासी शिखर परिषद घेतली. ज्या दिवशी रशियाने युक्रेनवर मोठा हल्ला केला होता.