Earthquake in Ecuador-Peru: इक्वेडोरमध्ये 6.8 रिश्टर स्केलचा भूकंप, 14 जणांचा मृत्यू
इक्वाडोरमधील दुसरे सर्वात मोठे शहर ग्वायाकिलच्या दक्षिणेस अंदाजे 80 किलोमीटर पॅसिफिक कोस्टजवळ 6.8 तीव्रतेचा भूकंप झाला.
दक्षिण अमेरिकन देश इक्वेडोरमध्ये (Ecuador) जोरदार भूकंपाचे (Earthquake) धक्के बसले आहेत. अमेरिकन भूगर्भीय सर्वेक्षणानुसार, इक्वाडोरमधील दुसरे सर्वात मोठे शहर ग्वायाकिलच्या दक्षिणेस अंदाजे 80 किलोमीटर पॅसिफिक कोस्टजवळ 6.8 तीव्रतेचा भूकंप झाला. भूकंपामुळे पेरूमध्ये एक व्यक्ती आणि इक्वाडोरमध्ये 14 जणांचा मृत्यू झाला, स्थानिक अधिकाऱ्यांनी किमान 126 लोक जखमी झाल्याची माहिती दिली. ग्वायासमध्ये भूकंप इतका तीव्र होता की संपूर्ण शहरात त्याचे धक्के जाणवले. अनेक घरे आणि इमारतींचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान या भूकंपाची तीव्रता पाहता मृतांच्या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
इक्वेडोरमधल्या कुएनका या ठिकाणी एक व्यक्ती कारमध्ये बसला होता आणि भूकंप झाला. यावेळी अचानक इमारतच त्याच्या कारवर पडली आणि त्याचा मृत्यू झाला. याशिवाय एल ओरो या किनारी राज्यामध्ये देखील तीन जणांचा मृत्यू झाला. इक्वेडोरचे राष्ट्राध्यक्ष गिलेर्मो लासो यांनी पत्रकारांना यावेळी माहिती देत सध्या अनेक परिसरात बचाव कार्य सुरु असल्याचे सांगितले.
यापूर्वी 6 फेब्रुवारीला तुर्कस्तानमध्ये झालेल्या भूकंपामुळे मोठं नुकसान झालं. यामध्ये 50 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता.रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 7.8 तीव्रता होती.