Dubai King Divorce: दुबईच्या राजाने दिला आपल्या सहाव्या पत्नीला घटस्फोट; तब्बल 5,500 कोटी रुपयांमध्ये झाली सेटलमेंट

अंगरक्षकाचे तोंड बंद ठेवण्यासाठी तिने आपल्या 10 वर्षांच्या मुलीच्या खात्यातून 7.5 दशलक्ष डॉलर्स अंगरक्षकाला दिले होते. शेख मोहम्मद बिन रशीद अल-मकतूम यांना पत्नी राजकुमारी हयाच्या अवैध संबंधांबद्दल समजल्यावर, त्यांनी तिला घटस्फोट दिला

दुबईचे पंप्रधान आणि हया (संग्रहित संपादित प्रतिमा)

दुबईचा राजा शेख मोहम्मद बिन राशिद अल-मकतूम (Sheikh Mohammed bin Rashid al-Maktoum) आणि त्याची सहावी आणि सर्वात लहान पत्नी राजकुमारी हया बिंत अल हुसैन (Princess Haya bint al-Hussein) यांचा घटस्फोट मंजूर झाला आहे. सध्या जगभरात या घटस्फोटाची चर्चा आहे कारण हा घटस्फोट जगातील महागड्या घटस्फोटांपैकी एक ठरला आहे. ब्रिटनच्या एका न्यायालयाने दुबईचा राजा शेख मोहम्मद बिन राशिद अल-मकतूम यांना त्यांची पत्नी राजकुमारी हया आणि मुलांना सुमारे £550 दशलक्ष (सुमारे $730 दशलक्ष) किंवा भारतीय चलनात 5,500 कोटी रुपये देण्याचे आदेश दिले आहेत.

घटस्फोटाची सेटलमेंट आणि मुलांच्या सुरक्षित भविष्यासाठी ही रक्कम राजाला द्यावी लागेल, असे न्यायाधीश फिलिप मूर यांनी सांगितले. ब्रिटिश इतिहासातीलदेखील हा एक महागडा घटस्फोट ठरला आहे. राजकुमारी हया ही जॉर्डनचे माजी राजे हुसेन यांची मुलगी आणि जॉर्डनचे राजे अब्दुल्ला II यांची सावत्र बहीण आहे. फिलिप मूर यांनी आपल्या निर्णयात राजकुमारी हया आणि तिच्या मुलांना दहशतवाद किंवा अपहरण यांसारख्या धोक्यांपासून संरक्षण देण्यासाठी विशेष व्यवस्था केली पाहिजे, असेही म्हटले आहे. ब्रिटनमध्ये त्यांना विशेष संरक्षणाची आवश्यकता असेल.

वृत्तानुसार, न्यायालयाने शेख मोहम्मद बिन रशीद अल-मकतूम यांना बँक गॅरंटीसह तीन महिन्यांच्या आत राजकुमारी हयाला £251.5 दशलक्ष एकरकमी रक्कम देण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय, मुलांच्या देखभाल आणि संरक्षणासाठी £290 दशलक्ष रक्कम देण्याचे आदेश दिले आहेत. शेखने आपल्या दोन मुलांची राजकुमारी लतीफा आणि राजकुमारी शमसा यांचे अपहरण करून त्यांना दुबईत राहण्यास भाग पाडण्याची योजना आखली होती. लतीफाने तिच्या वडिलांवर तिला ओलीस ठेवल्याचा आरोप केला होता.

राजकुमारी हया आता तिच्या दोन मुलांसह लंडनच्या पश्चिमेकडील केन्सिंग्टन पॅलेसजवळ एका घरात राहते, जे तिला जॉर्डनचे दिवंगत राजा हुसेन यांच्याकडून वारशाने मिळाली आहे. राजकुमारी हयाने 2004 मध्ये शेखसोबत लग्न केले. न्यायालयाच्या निर्णयानुसार, शेखने शरिया कायद्यानुसार 2019 मध्ये राजकुमारी हयाला घटस्फोट दिला होता. (हेही वाचा: 30 वर्षांपूर्वी पाठवलेल्या जगातील पहिल्या SMS चा लिलाव; 2 कोटी रुपयांपर्यंत लागू शकते बोली, जाणून घ्या काय होता तो संदेश)

हयाचे तिच्या अंगरक्षकासोबत अवैध संबंध होते. अंगरक्षकाचे तोंड बंद ठेवण्यासाठी तिने आपल्या 10 वर्षांच्या मुलीच्या खात्यातून 7.5 दशलक्ष डॉलर्स अंगरक्षकाला दिले होते. शेख मोहम्मद बिन रशीद अल-मकतूम यांना पत्नी राजकुमारी हयाच्या अवैध संबंधांबद्दल समजल्यावर, त्यांनी तिला घटस्फोट दिला ज्यामुळे प्रकरण न्यायालयात गेले.