Diwali 2022: आता New York शहरातील शाळांना मिळेल दिवाळीची सार्वजनिक सुट्टी; महापौरांची मोठी घोषणा
न्यूयॉर्कमधील भारताचे महावाणिज्य दूत रणधीर जैस्वाल यांनी दिवाळीला शाळेची सुट्टी जाहीर केल्याबद्दल अॅडम्सचे आभार मानले. ते म्हणाले, ‘भारतीय-अमेरिकन समुदायाची ही प्रलंबित मागणी होती.'
भारतामध्ये आजपासून दिवाळीला (Diwali 2022) सुरुवात झाली आहे. आज सर्वत्र वसुबारस (Vasubaras 2022) साजरा होत आहे. देशाप्रमाणेच विदेशातील भारतीय देखील या सणाची आतुरतेने वाट पाहत असतात. परदेशात अनेक ठिकाणी हा सण मोठ्या उत्साहात साजरा होतो. आता अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरातून (New York City) दिवाळी सणासंदर्भात एक आनंदाची बातमी समोर आली आहे. न्यूयॉर्कच्या येथे 2023 पासून सार्वजनिक शाळांना दिवाळीची सुट्टी असणार आहे. हा निर्णय प्रलंबित असल्याचे महापौर एरिक अॅडम्स (Eric Adams) यांनी सांगितले.
या निर्णयामुळे मुलांना दीपोत्सवाची तसेच हा उत्सव कसा साजरा करतात याबाबत माहिती मिळण्यास प्रोत्साहन मिळेल. न्यूयॉर्क असेंब्ली सदस्य जेनिफर राजकुमार आणि न्यूयॉर्क सिटी स्कूलचे चान्सलर डेव्हिड बँक्स यांच्यासह महापौर एरिक अॅडम्स यांनी हा निर्णय घेतला आहे.
गुरुवारी एका मोहिमेदरम्यान ते म्हणाले की, ‘दिवाळी आणि दिव्यांचा सणाद्वारे आपण खूप काही शिकलो आहोत. हा सण भारतामधील सर्वात मोठ्या सणापैकी एक आहे, त्यामुळे न्यूयॉर्क शहरातील सार्वजनिक शाळांमध्ये दिवाळीची सुट्टी घोषित केली जात आहे. या सणाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या आणि हा सण मोठ्या उत्साहात साजरा करणाऱ्या असंख्य लोकांना हा सण आमच्यासाठीही महत्वाचा असल्याचा संदेश आम्हाला द्यायचा होता.’
न्यूयॉर्कमधील भारताचे महावाणिज्य दूत रणधीर जैस्वाल यांनी दिवाळीला शाळेची सुट्टी जाहीर केल्याबद्दल अॅडम्सचे आभार मानले. ते म्हणाले, ‘भारतीय-अमेरिकन समुदायाची ही प्रलंबित मागणी होती. या निर्णयामुळे विविधता आणि बहुलवादाला चालना मिळाली आहे. आता सर्व स्तरातील लोक भारतीय सण साजरे करू शकतील आणि त्यांचा आनंद घेऊ शकतील.’ (हेही वाचा: Gold Price Today: सोन्याच्या दरात पुन्हा घसरण; जाणून घ्या तुमच्या शहरातील सोन्या-चांदीचे भाव)
न्यूयॉर्कमधील राज्य कार्यालयात निवडून आलेल्या पहिल्या दक्षिण आशियाई-अमेरिकन महिला राजकुमार म्हणाल्या की, ‘मला हे सांगताना मला अभिमान वाटतो की, दिवाळी साजरी करणारे हिंदू, बौद्ध, शीख आणि जैन अशा 200,000 हून अधिक भारतीय-न्यूयॉर्कर्सना ओळखण्याची वेळ आली आहे. दरम्यान, गेल्या काही वर्षांपासून हिंदू समुदायाकडून दिवाळीला शालेय सुट्टी जाहीर करण्याचे आवाहन केले जात होते. याबाबतचा कायदा पूर्ण झाल्यावर, पुढील वर्षीपासून न्यूयॉर्क शहरातील शाळेला दिवाळी सुट्टी असेल.
(The above story first appeared on LatestLY on Oct 21, 2022 05:18 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

