Coronavirus: अमेरिकेत गेल्या 24 तासांत 1435 कोरोना बाधितांचा मृत्यू
ही आकडेवारी पाहता अमेरिकेत कोरोनाची बाबातची स्थिती दिवसेंदिवस चिघळत चालली असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
कोविड-19 (COVID-19) विषाणूने जगभरात हाहाकार माजविला असून याचा सर्वात मोठा फटका अमेरिकेला बसला आहे. अमेरिकेत कोरोना ने अक्षरश: हैदोस घातला असून मृत्यूचे तांडव सुरु केले आहे. गेल्या 24 तासांत अमेरिकेत 1435 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाने (Johns Hopkins University) दिली आहे. ही आकडेवारी पाहता अमेरिकेत कोरोनाची बाबातची स्थिती दिवसेंदिवस चिघळत चालली असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. जगभरात आतापर्यंत 34 लाखांहून अधिक कोरोना संक्रमित रुग्ण आढळल्याचे सांगण्यात येत आहे.
जगभरात सद्य स्थितीत 2 लाखांहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेत मृतांची एकूण संख्या 67,000 च्या वर पोहोचली आहे. त्यापाठोपाठ स्पेनमध्ये 2,45,000 हून अधिक कोविड-19 रुग्ण आढळून आले आहेत. तर या देशात मृतांची संख्या ही 25,000 च्या वर जाऊन पोहोचली आहे.
तर फ्रांसमध्ये कोरोना बाधितांची संख्या दीड लाखाच्या वर गेली आहे, तर 24 हजार पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. अशात फ्रांसमध्ये आरोग्य आणीबाणी (Health Emergency) 24 जुलैपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. देशाचे आरोग्य मंत्री आरोग्यमंत्री ऑलिव्हियर वेरान यांनी याबाबत माहिती दिली.
भारतात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होऊ लागली आहे. देशात आतापर्यंत 1223 लोकांचा मृत्यू तर, एकूण 37 हजार 776 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 10 हजार 018 लोक कोरोनामुक्त झाले आहेत.केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याची माहिती दिली आहे. यामुळे सर्वत्र भितीजनक वातावरण निर्माण झाले आहे. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता सरकारकडून युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत.