COVID-19 Vaccine Update: रशियाची Sputnik V लस ठरली 95 टक्के प्रभावी; जानेवारी 2021 मध्ये सुरु होणार वितरण, जाणून घ्या किंमत

सध्या तरी यावर कोणतेही ठोस औषध नसल्याने, लसीवरच (Coronavirus Vaccine) सर्वांच्या आशा टिकून आहेत. सध्या जगामध्ये काही महत्वाच्या कंपन्या कोरोना लस बनवत आहेत व त्यांच्या क्लिनिकल ट्रायल अंतिम टप्प्यात आल्या आहेत.

Sputnik V Vaccine (Photo Credits: File Image)

कोरोना विषाणूचा (Coronavirus) संसर्ग दिवसेंदिवस वाढतच आहे. सध्या तरी यावर कोणतेही ठोस औषध नसल्याने, लसीवरच (Coronavirus Vaccine) सर्वांच्या आशा टिकून आहेत. सध्या जगामध्ये काही महत्वाच्या कंपन्या कोरोना लस बनवत आहेत व त्यांच्या क्लिनिकल ट्रायल अंतिम टप्प्यात आल्या आहेत. कोणत्या लसीची काय किंमत असेल? ती लस बाजारात कधी येईल? असे प्रश्न लोकांच्या सध्या मनात आहेत. त्यात रशियाच्या स्पुतनिक-व्ही (Sputnik V) लसविषयी मोठी माहिती समोर आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात स्पुतनिक-व्हीची मात्रा 10 डॉलरपेक्षा कमी किंमतीमध्ये उपलब्ध होईल. त्याच वेळी, रशियाच्या नागरिकांसाठी ही लस विनामूल्य असेल. एका व्यक्तीला या लसच्या दोन डोसची आवश्यकता असेल.

रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंडने (RDIF) मंगळवारी एक निवेदन प्रसिद्ध केले आणि याबाबतची माहिती दिली. ही लस आरडीआयएफ आणि गमलेया नॅशनल सेंटर ऑफ एपिडिमियोलॉजी अँड मायक्रोबायोलॉजी (Gamaleya National Center of Epidemiology and Microbiology) यांनी संयुक्तपणे विकसित केली आहे. क्लिनिकल ट्रायलच्या दुसर्‍या अंतरिम विश्लेषणानुसार, Sputnik V चा पहिला डोस दिल्यानंतर 28 दिवसांनी ती 91.4 टक्के प्रभावी ठरली आहे. पहिल्या डोसनंतर 42 दिवसांनी लसीची कार्यक्षमता 95 टक्के प्रभावी आढळली आहे.

आरडीआयएफचे मुख्य कार्यकारी अधिकारी किरिल दिमित्रीव म्हणाले की, बेलारूस, ब्राझील, युएई आणि भारतमध्ये क्लिनिकल चाचण्या सुरू आहेत. वृत्तानुसार, Sputnik V लसचे पहिले आंतरराष्ट्रीय वितरण जानेवारी 2021 मध्ये सुरु होईल. यापूर्वी फायजर आणि मॉडर्ना यांनी आपली कोविड-19 विरूद्धची लस 90 टक्क्यांहून अधिक प्रभावी असल्याचे सांगितले आहे. रशियाने ऑगस्टमध्ये Sputnik V नोंदणी केली होती. या लसीचा डोस रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या मुलीलाही देण्यात आला आहे. तसेच ही लस फायजर आणि मॉडर्ना लसपेक्षा कमी किंमतीमध्ये उपलब्ध होईल असे सांगण्यात आहे. (हेही वाचा: कधी संपणार Coronavirus महामारी? आता COVID-19 वर विजय मिळवण्यासाठी लस हीच मोठी आशा- WHO Chief Tedros Adhanom)

दरम्यान, रशियाने आतापर्यंत तीन कोरोना लसी बनविण्याचा दावा केला आहे. ऑगस्टमध्ये, Sputnik V लॉन्च केली होती. त्यानंतर 14 ऑक्टोबरला EpiVacCorona ही लस आली आणि अलीकडे रशियाने कोरोनासाठी तिसरी लस तयार केल्याचा दावा केला आहे.