Corruption Perception Index: डेन्मार्क ठरला सर्वात कमी भ्रष्टाचार असलेला देश; पाकिस्तान 140, तर बांगलादेश 147 व्या स्थानावर, जाणून घ्या भारताची स्थिती

त्याचबरोबर फिनलंड दुसऱ्या क्रमांकावर, न्यूझीलंड तिसऱ्या, नॉर्वे चौथ्या आणि सिंगापूर पाचव्या क्रमांकावर आहे

प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-ट्वीटर)

'ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल' (Transparency International) या जगप्रसिद्ध संस्थेने मंगळवारी 'करप्शन परसेप्शन इंडेक्स' (CPI) प्रसिद्ध केला. या निर्देशांकात जगातील 180 देशांचा समावेश करण्यात आला आहे. या देशांतील भ्रष्टाचाराच्या (Corruption) पातळीच्या आधारे त्यांची क्रमवारी लावण्यात आली आहे. CPI निर्देशांकानुसार, भारताला एका रँकिंगचा फायदा झाला असून, भारत 180 देशांमध्ये 85 व्या स्थानावर पोहोचला आहे. दुसरीकडे, पाकिस्तानची परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. त्याची कामगिरी सुधारण्याऐवजी खराब झाली आहे. या यादीत पाकिस्तान 124 वरून 140 व्या स्थानावर आला आहे.

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यासाठी हा एक मोठा झटका आहे. त्यांनी सत्तेत येण्यापूर्वी आपले सरकार भ्रष्टाचारमुक्त देश बनवण्याचे आश्वासन दिले होते. ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलने म्हटले आहे की 2021 च्या जागतिक 'भ्रष्टाचार धारणा निर्देशांक' मध्ये पाकिस्तान 16 स्थानांनी घसरला आहे आणि 180 देशांपैकी 140 क्रमांकावर आहे. जागतिक भ्रष्टाचाराचा मुकाबला करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या बर्लिनस्थित ना-नफा संस्थेने जारी केलेल्या अहवालात जगभरातील भ्रष्टाचाराची पातळी स्थिर असल्याचे म्हटले आहे. यामध्ये 86 टक्के देशांनी गेल्या 10 वर्षात फारशी प्रगती केलेली नाही.

'करप्शन परसेप्शन इंडेक्स' ने सार्वजनिक क्षेत्रातील भ्रष्टाचाराच्या त्यांच्या कथित स्तरांवर आधारित शून्य (अत्यंत भ्रष्ट) ते 100 (अत्यंत स्वच्छ) या स्केलवर 180 देश आणि प्रदेशांची क्रमवारी लावली होती. 2020 मध्ये, पाकिस्तानला 100 पैकी 31 गुण मिळाले आणि ते 180 देशांपैकी 124 व्या क्रमांकावर होते. ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलच्या मते, यंदा देशाचा भ्रष्टाचाराचा स्कोअर आता 28 वर आला आहे, तर निर्देशांकात एकूण 180 देशांपैकी 140 क्रमांकावर गेला आहे. त्या तुलनेत भारताचा स्कोअर 40 असून तो 85 व्या क्रमांकावर आहे. त्याच वेळी, बांगलादेशचा स्कोअर 26 आहे आणि तो 147 व्या स्थानावर आहे. (हेही वाचा: भ्रष्टाचार प्रकरणात सहभागी असलेल्या 148 सरकारी अधिकाऱ्यांना अद्याप निलंबित करण्यात आले नाही- ACB Data)

यंदाच्या यादीत डेन्मार्कने जगात सर्वोत्तम कामगिरी केली असून तो पहिल्या क्रमांकावर आहे. त्याचबरोबर फिनलंड दुसऱ्या क्रमांकावर, न्यूझीलंड तिसऱ्या, नॉर्वे चौथ्या आणि सिंगापूर पाचव्या क्रमांकावर आहे. दुसरीकडे, सर्वात वाईट स्थिती दक्षिण सुदानची आहे आणि तो 180 व्या क्रमांकावर आहे. त्याआधी सीरिया, सोमालिया, व्हेनेझुएला आणि येमेनचा क्रमांक लागतो.