धक्कादायक! चीनमध्ये कोरोना व्हायरसमुळे 24 हजार लोकांचा मृत्यू? Tencent कंपनीचा डेटा लीक झाल्याने जगभरात खळबळ

या व्हायरसमुळे सध्या चीनमध्ये (China) 500 पेक्षा अधिक लोक मरण पावल्याची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे

Coronavirus Scare (Photo Credits: IANS)

कोरोना विषाणूने (Corona Virus) एका भीषण साथीचे रूप धारण केले आहे. या व्हायरसमुळे सध्या चीनमध्ये (China) 500 पेक्षा अधिक लोक मरण पावल्याची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र ही परिस्थिती अजून प्रचंड गंभीर असल्याचे वृत्त समोर येत आहे. चीनची दुसर्‍या क्रमांकाची कंपनी टेंन्सेंटकडून (Tencent) अनावधानाने डेटा लीक झाल्याने, या आजाराची भीती उघडकीस आली आहे. टेंन्संटच्या म्हणण्यानुसार, करोना व्हायरसमुळे देशात आतापर्यंत 24 हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे, चीन सरकारने असा दावा केला आहे की या विषाणूमुळे आतापर्यंत केवळ 563 लोकांचा मृत्यू झाला आहे.

यामुळे जगभरात वाद वाढल्यानंतर टेंन्सेन्टने आपली आकडेवारी बदलली, मात्र अनवधानाने हा डेटा उघडकीस आल्यानंतर, आता चीन कम्युनिस्ट पार्टी जगभरात करोना विषाणूची तीव्रता लपवत असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.

तैवान न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, अनेक देशांमध्ये व्यवसाय करणारी चिनी कंपनी टेंन्सेंट यांनी शनिवारी म्हटले आहे की, या कोरोना विषाणूचा परिणाम 154,023 लोकांवर झाला आहे व एकूण 24 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. टेंन्सेंटची ही आकडेवारी चीनच्या अधिकृत आकडेवारीपेक्षा 80 पट जास्त होती. मात्र नंतर त्यांनी आपली आकडेवारी बदलली. त्यानंतर त्यांनी केवळ 14,446 लोकांना या आजाराने ग्रासले असल्याचे सांगितले. (हेही वाचा: धक्कादायक! चीन मध्ये नवजात बाळाला जन्माच्या अवघ्या 30 तासांमध्ये झाली कोरोना व्हायरस ची लागण; अर्भकावर तातडीचे उपचार सुरु)

चिनी कंपनी टेंन्सेंट दोन प्रकारचे डेटा बाळगत आहे. एक म्हणजे मृत्यू झालेल्या लोकांचा आणि बाधित झालेल्या लोकांचा वास्तविक डेटा आणि दुसरा सरकारने मंजूर केलेला डेटा. काही लोकांचा असा अंदाज आहे की, कोडिंगच्या त्रुटीमुळे टेंन्सेंटचा हा वास्तविक डेटा ऑनलाइन लीक झाला आहे. तैवान न्यूजने सूत्रांच्या हवाल्याने असे सांगितले आहे की, कोरोना विषाणूमुळे पीडित लोकांचे वुहानमध्ये उपचार केले जात नाहीत आणि ते रूग्णालयाच्या बाहेरच मरत आहेत. याशिवाय टेस्ट किटची मोठी कमतरता आहे, त्यामुळेही बरीच प्रकरणे समोर येत नाहीत आणि लोक मरत आहेत.