चीनचे राष्ट्राध्यक्ष Xi Jinping यांचे PM Narendra Modi यांना पत्र; कोरोना विषाणू साथीशी लढण्यासाठी देऊ केली मदत
पत्रात त्यांनी भारतामधील कोरोना साथीच्या परिस्थितीविषयी संवेदना व्यक्त करत, या दुसऱ्या लाटेला सामोरे जाण्यासाठी मदतीची ऑफर दिली
सध्या भारत मोठ्या प्रमाणावर कोरोना विषाणू (Coronavirus) संसर्गाचा सामना करीत आहे. जगातील अनेक देशांनी भारतासमोर मदतीचा हा पुढे केला आहे. आता चीनचे (China) राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग (Xi Jinping) यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र (PM Narendra Modi) मोदींना पत्र लिहिले आहे. पत्रात त्यांनी भारतामधील कोरोना साथीच्या परिस्थितीविषयी संवेदना व्यक्त करत, या दुसऱ्या लाटेला सामोरे जाण्यासाठी मदतीची ऑफर दिली. या संदेशात जिनपिंग यांनी असे म्हटले आहे की, साथीच्या रोगाविरूद्ध लढण्यासाठी चीन भारताला समर्थन आणि मदत देऊ इच्छित आहे. गेल्या वर्षी लडाखच्या गालवानमध्ये दोन्ही देशांमधील भांडण व संघर्षानंतर चीन आणि भारत यांच्यातील हा पहिला पत्रव्यवहार आहे.
याच्या एक दिवस आधी चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांनी, कोरोनाविरूद्ध युद्धात भारताची मदत करण्याचे वचन देताना म्हटले होते की, चीनमध्ये तयार झालेल्या आणि कोरोनाविरूद्ध वापरण्यात येणाऱ्या गोष्टी वेगाने भारतात पाठविल्या जाऊ शकतात, ज्यामुळे भारताला मदत मिळू शकेल. परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना लिहिलेल्या पत्रात वांग म्हणाले की, भारत ज्याप्रकारे कोरोना विषाणूशी लढा देत आहे त्याबाबत चीन सहानुभूती व्यक्त करतो.
ते पुढे म्हणाले, 'चीनच्या बाजूने भारताच्या गरजेनुसार जास्तीत जास्त आधार आणि मदत पुरविली जाईल. आम्हाला आशा आणि विश्वास आहे की भारत सरकारच्या नेतृत्वात भारतीय जनता लवकरात लवकर या महामारीवर मात करेल.’ अध्यक्ष शी आणि परराष्ट्रमंत्री वांग यांचा संदेश अशावेळी आला आहे, जेव्हा पूर्व लडाखच्या उर्वरित तणावग्रस्त भागातून दोन्ही देशांच्या सैन्याने अद्याप माघार घेतली नाही. फेब्रुवारी महिन्यात दोन्ही देशांची लष्कराची पागोंग लेक परिसरातून माघार झाली होती. (हेही वाचा: North Korea: अधिकाऱ्याने चीनकडून निकृष्ट दर्जाचा माल मागवला; संतापलेल्या Kim Jong Un ने दिली मृत्यूदंडाची शिक्षा)
दरम्यान, भारतात सध्या सुरू असलेल्या कोरोना व्हायरसच्या संकटाला तोंड देण्यासाठी अनेक भारतीय खासगी कंपन्या चीनकडून आवश्यक वैद्यकीय उपकरणे घेत आहेत. स्पाइस हेल्थ या खासगी कंपनीने 800 ऑक्सिजन कॉसंट्रेटर्स भारतामध्ये पोहोचवले आहेत.