China Warns World War Three: चीन आणि तैवानमधील तणाव वाढला; ड्रॅगनने दिली तिसऱ्या महायुद्धाची धमकी, जाणून घ्या सविस्तर 

ग्लोबल टाइम्सने म्हटले आहे की, तैवान आणि अमेरिकेची ‘मिलीभगत’ एक धासाई पाऊल आहे

China Flag (Photo Credits-Twitter)

चीन (China) आणि तैवानमधील (Taiwan) तणाव दिवसेंदिवस वाढत आहे. 150 चिनी लढाऊ विमानांनी शुक्रवारपासून अनेक वेळा तैवानच्या हवाई क्षेत्राचे उल्लंघन केले आहे. अशा परिस्थितीत तैवानने चीनला उघडपणे धमकी दिली आहे. 1 ऑक्टोबर रोजी चीनने आपला राष्ट्रीय दिन साजरा केला आणि त्यांच्या लष्करी पराक्रमाच्या प्रदर्शनात चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने तैवानच्या संरक्षण हवाई क्षेत्रात 38 लढाऊ विमाने उडवली. तैवानविरुद्ध सातत्याने अणुबॉम्बर्स पाठवून चीन ददगी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. अशात चीनच्या ग्लोबल टाइम्स या सरकारी वृत्तपत्राने इशारा दिला आहे की जगात कधीही तिसरे महायुद्ध (World War Three) भडकू शकते.

चिनी वृत्तपत्राने हा इशारा अशा वेळी दिला आहे, जेव्हा अमेरिका, यूके, कॅनेडियन आणि ऑस्ट्रेलियन नौदल युद्धनौका दक्षिण चीन समुद्रात सतत गस्त घालत आहेत. ग्लोबल टाइम्सने म्हटले आहे की, तैवान आणि अमेरिकेची ‘मिलीभगत’ एक धासाई पाऊल आहे आणि परिणामी इतर कोणत्याही डावपेचांना किंवा युक्त्यांना आता जागा नाही.

ग्लोबल टाइम्सने आपल्या लेखात दावा केला आहे की, चीन तैवानला मदत करणाऱ्या अमेरिकेसोबत पूर्ण युद्धासाठी पूर्णपणे तयार आहे. दुसरीकडे, तैवानचे राष्ट्राध्यक्ष त्साई इंग-वेन यांनी जगाला इशारा दिला आहे की, जर त्यांचा देश चीनच्या हातात गेला तर त्याचे आशिया-पॅसिफिक क्षेत्रात भयंकर परिणाम होतील. तैवानच्या राष्ट्रपतींनी जाहीर केले की, जर आपली लोकशाही आणि जीवनपद्धती धोक्यात आली तर तैवान स्वतःचे संरक्षण करण्यासाठी योग्य ते प्रत्येक पाऊल उचलेल.

तैवान स्वतःला एक स्वशासित लोकशाही बेट मानतो, पण चीनचा असा विश्वास आहे की तैवान हा त्याचाच एक भाग आहे. तैवानमध्ये 2016 च्या अध्यक्षीय निवडणुकांपासून, चीनने या भागातील लष्करी, मुत्सद्दी आणि आर्थिक दबाव वाढवला आहे. 2016 मध्ये इंग-वेन यांनी निवडणुका जिंकल्या आणि त्या तैवानला स्वतंत्र राष्ट्र मानत आहेत. तैवान हा चीनचा भाग नाही असे त्यांनी वारंवार सांगितले आहे.

चीनपासून अवघ्या फक्त 180 किमी अंतरावर असलेल्या तैवानची भाषा आणि पूर्वज चीनी आहेत, परंतु तेथील राजकीय व्यवस्था अगदी वेगळी आहे. मात्र चीन आपली लष्करी क्षमता दाखवून तैवानवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे. (हेही वाचा: पाकिस्तानमध्ये सक्रीय आहेत तब्बल 12 दहशतवादी संघटना; अनेकांचे लक्ष्य आहे भारत, Report मधून धक्कादायक खुलासा)

दरम्यान, ब्रिटनची अतिशय शक्तिशाली विमानवाहक नौका क्वीन एलिझाबेथ अमेरिकन विमानवाहू युद्धनौका यूएसएस रोनाल्ड रीगन आणि यूएसएस कार्ल विन्सन यांच्यासोबत फिलिपिन्स समुद्रात संयुक्त अभ्यास करताना दिसली आहे. यासह, जपानचे हेलिकॉप्टर डिस्ट्रॉयर जेएस देखील तिथे उपस्थित आहे. अमेरिकेबरोबर उपस्थित असलेल्या या संपूर्ण सैन्याबरोबरच इतर सहा देशांच्या युद्धनौकाही गस्त घालत आहेत. दक्षिण चीन समुद्राचा हा भाग वादग्रस्त आहे.