Canada: धक्कादायक! बंद असलेल्या बोर्डिंग स्कूलच्या आवारात मिळाले 215 मुलांचे अवशेष; आतापर्यंत मृत्यू झालेल्या 4100 मुलांची ओळख पटली

अहवालात असेही म्हटले आहे की मुलांना येथे शारीरिक शोषण, बलात्कार, कुपोषण आणि इतर अत्याचाराचा सामना करावा लागत असे.

Human Skull/(Photo Credits: Getty Images)

कॅनडामधील (Canada) मानवी नरसंहाराची एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. इथे बंद असलेल्या बोर्डिंग स्कूलच्या आवारात 215 आदिवासी मुलांचे अवशेष सापडले आहेत. त्यातील काही मुलांचे वय तीन वर्षांपर्यंतचे असल्याचे सांगितले जात आहे. शुक्रवारी (28 मे 2021) कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो (Justin Trudeau) यांनी यासंदर्भात माहिती दिली आणि ही गोष्ट हृदयद्रावक असल्याचे म्हटले. गेल्या आठवड्यात जीपीआरच्या सहाय्याने मृतदेह शोधण्यात आल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली. ते म्हणाले की, शाळेच्या आवारातील अजून काही भाग तपासणे बाकी आहे त्यामुळे आणखी मृतदेह बाहेर काढले जाऊ शकतात.

ही मुले ब्रिटिश कोलंबियामध्ये 1978 मध्ये बंद झालेल्या कमलूप्स इंडियन रेसिडेन्शियल स्कूलचे (KIRS) विद्यार्थी होती. गुरुवारी, मुलांच्या अवशेषांची माहिती टेमलप्स टी क्वपेमसी फर्स्ट नेशन प्रमुखांनी दिली. फर्स्ट नेशन म्युझियम तज्ञ आणि कोरेनर ऑफिस एकत्र यांच्या मृत्यूचे कारण आणि काळ शोधण्यासाठी कार्य करीत आहेत. 19 व्या आणि विसाव्या शतकात स्वदेशी तरुणांना जबरदस्तीने आपल्या अधिकाराखाली घेण्यासाठी कॅनडामध्ये सरकार आणि धार्मिक प्रशासन अशा निवासी शाळा चालवत असे.

कमलूप्स इंडियन रेसिडेन्ट स्कूल ही त्यावेळची सर्वात मोठी निवासी सुविधा होती. रोमन कॅथोलिक प्रशासनात 1890 मध्ये सुरू झालेल्या या शाळेत 1950 च्या दशकात 500 पेक्षा जास्त विद्यार्थी होते. 1969 मध्ये, शाळा प्रशासनाला केंद्र सरकारने आपल्या ताब्यात घेतले आणि 1978 मध्ये ते बंद होईपर्यंत स्थानिक विद्यार्थ्यांसाठी निवासी शाळा म्हणून चालविले. या शाळेबाबत अशी माहिती मिळते की, इथे आदिवासी मुलांना सुसंस्कृत बनवण्यासाठी ख्रिश्चन धर्माचा धडा शिकविला जायचा. यामध्ये मुलांची स्वतःची भाषा आणि संस्कृती नष्ट केली जायची. (हेही वाचा: Canada: संसदेच्या बैठकीत खासदार William Amos यांचे अश्लील कृत्य; चक्क कॉफी कपमध्ये लघवी करताना दिसले)

अहवालात म्हटले आहे की 1883 ते 1998 पर्यंत दीड लाख आदिवासी मुले त्यांच्या कुटुंबियांपासून वेगळी अशा निवासी शाळांमध्ये होती. अहवालात असेही म्हटले आहे की मुलांना येथे शारीरिक शोषण, बलात्कार, कुपोषण आणि इतर अत्याचाराचा सामना करावा लागत असे. या निवासी शाळेत आतापर्यंत मृत्यू झालेल्या 4100 मुलांची ओळख पटली आहे. परंतु कॅनडाच्या सर्वात मोठ्या निवासी शाळेत पुरल्या गेलेल्या या 215 मुलांच्या रेकॉर्डचा यादीमध्ये समावेश नाही.