Burqa Ban in Switzerland: स्वित्झर्लंडमध्ये बुरखा-नकाब घालणे तसेच चेहरा झाकण्यावर बंदी; संसदेने मंजूर केला प्रस्ताव, उल्लंघन केल्यास होणार दंड
युरोपबाहेर चीन आणि श्रीलंकेतही बुरख्यावर बंदी आहे. आता स्वित्झर्लंड या देशांमध्ये सामील झाले आहे.
स्वित्झर्लंडमध्ये (Switzerland) बुरखा किंवा निकाब घालणे तसेच चेहरा झाकण्यावर बंदी (Burqa Ban) घालण्यात आली आहे. स्विस संसदेच्या कनिष्ठ सभागृहाने बुधवारी बुरख्यावर बंदी घालण्याचा प्रस्ताव मंजूर केला. आता स्वित्झर्लंडमध्ये सार्वजनिक ठिकाणी तोंड, नाक आणि डोळे झाकणारा मास्क किंवा बुरखा घालता येणार नाही. तरीही कोणी ते घातल्यास ते बेकायदेशीर कृत्य मानले जाईल. तसेच बुरखा किंवा निकाब घातल्यास एक हजार स्विस फ्रँक म्हणजेच 92 हजार रुपये दंड आकारला जाईल.
यापूर्वी फ्रान्स, बेल्जियम, ऑस्ट्रिया आणि नेदरलँड या देशांनी चेहरा झाकण्यावर बंदी घातली आहे. युरोपबाहेर चीन आणि श्रीलंकेतही बुरख्यावर बंदी आहे. आता स्वित्झर्लंड या देशांमध्ये सामील झाले आहे. स्विस संसदेच्या कनिष्ठ सभागृहात बुरखा आणि निकाबवर बंदी घालण्याबाबत झालेल्या मतदानात 151 खासदारांनी याच्या बाजूने मतदान केले, तर 29 खासदारांनी विरोधात मतदान केले. हा प्रस्ताव स्वित्झर्लंडच्या वरिष्ठ सभागृहाने यापूर्वीच स्वीकारला आहे.
जगातील सर्वात श्रीमंत देशांपैकी एक असलेल्या स्वित्झर्लंडमध्ये सर्वाधिक निर्णय जनमताने घेतले जातात. 2021 मध्ये देशभरात सार्वजनिक ठिकाणी आणि खाजगी इमारतींमध्ये बुरख्यावर बंदी घालण्याबाबत सार्वमत घेण्यात आले. या सार्वमतामध्ये 51% लोकांनी बुरख्यावरील बंदीच्या बाजूने मतदान केले.
स्वित्झर्लंडमधील एगरकिनझेन समितीने सार्वजनिक ठिकाणी बुरखा आणि निकाबवर बंदी घालण्यासाठी 2016 मध्ये प्रयत्न सुरू केले. त्यानंतर 2021 मध्ये मतदान झाले. स्वित्झर्लंडच्या राष्ट्रवादी स्विस पक्षाने कट्टरपंथी इस्लामविरुद्ध मोठा विजय म्हणून सार्वमताच्या निकालांचे स्वागत केले.
संसदेने संमत केलेल्या कायद्याचा हेतू असा आहे की, याद्वारे कोणतीही स्त्री किंवा पुरुष चेहरा झाकून आपली ओळख लपवू नये. मात्र, नव्या नियमांमध्ये काही शिथिलताही देण्यात आल्या आहेत. स्वित्झर्लंडची एकूण लोकसंख्या अंदाजे 89 लाख आहे. त्यात 62.6% ख्रिश्चन आणि 5.4% मुस्लिम आहेत. देशात जवळपास 30% लोक कोणत्याही धर्माला मानत नाहीत.