Blast in Balochistan: पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात स्फोट, 5 शाळकरी मुलांसह 7 जण ठार
प्रांताच्या मस्तुंग जिल्ह्यातील सिव्हिल हॉस्पिटल चौकात एका शाळेजवळ सकाळी 8.35 वाजता हा स्फोट झाला.
Blast in Balochistan: पाकिस्तान (Pakistan) च्या अशांत बलुचिस्तान (Balochistan) प्रांतात शुक्रवारी झालेल्या रिमोट-नियंत्रित स्फोटात पाच शाळकरी मुले आणि एका पोलिसासह किमान सात जण ठार झाले. प्रांताच्या मस्तुंग जिल्ह्यातील सिव्हिल हॉस्पिटल चौकात एका शाळेजवळ सकाळी 8.35 वाजता हा स्फोट झाला, असे डॉन वृत्तपत्राने म्हटले आहे. कलत विभागाचे आयुक्त नईम बझाई यांनी सांगितले की, आतापर्यंत, पाच शालेय विद्यार्थ्यांसह सात जणांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्यात 22 जण जखमी झाले आहेत.
जखमींपैकी बहुतेक शाळकरी मुले आहेत, जिओ न्यूजच्या वृत्तानुसार, त्यांना जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे. स्फोटात पोलिस व्हॅन आणि अनेक ऑटो-रिक्षांचे नुकसान झाले आहे. स्फोटानंतर क्वेट्टाच्या सर्व रुग्णालयात आणीबाणी घोषित करण्यात आली. प्रांतीय आरोग्य विभागाच्या प्रवक्त्याच्या हवाल्याने अहवालात म्हटले आहे की, सर्व डॉक्टर, फार्मासिस्ट, स्टाफ नर्स आणि इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांना बोलावण्यात आले आहे. (हेही वाचा -Steel Plant Explosion In Central Mexico: मेक्सिकोच्या स्टील प्लांटमध्ये भीषण स्फोट; 12 जणांचा मृत्यू, एक जखमी)
दरम्यान, बलुचिस्तानचे मुख्यमंत्री सरफराज बुगती यांनी या स्फोटाचा निषेध करत जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला. त्यांनी शहीद पोलिस कर्मचारी आणि शाळकरी मुलांचे नातेवाईक यांच्याबद्दल शोक व्यक्त केला. दहशतवाद्यांनी आता मजुरांसह निष्पाप मुलांना लक्ष्य केले आहे, असं बुगती यांनी म्हटलं आहे. (हेही वाचा -Cylinder Blast In Navi Mumbai Ulwe: नवी मुंबईतील उलवे येथे सिलिंडरचा स्फोट; एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू, एक जखमी)
सिनेटचे अध्यक्ष युसूफ रझा गिलानी यांनीही या घटनेचा निषेध केला असून निष्पाप जीव गमावल्याबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. दहशतवादी घटक हे मानवतेचे शत्रू आहेत. दहशतवादाविरुद्ध देश सुरक्षा दल आणि कायदा अंमलबजावणी संस्थांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, असे गिलानी यांनी म्हटलं आहे.