Bangladesh Violence: बांगलादेश हिंसाचारामागे पाकिस्तानी गुप्तचर संस्था ISI व चीनचा हात? अहवालात समोर आली धक्कादायक माहिती

आयएसआयने त्यांना आर्थिक मदत केली असण्याची शक्यता आहे. चीनलाही बांगलादेशात गुंतवणूक करायची होती, पण शेख हसीना यांच्या भारताशी असलेल्या चांगल्या मैत्रीमुळे चीन आपल्या हेतूत यशस्वी होऊ शकला नाही.

Violence Continues in Bangladesh (Photo Credits: ANI)

Bangladesh Violence: बांगलादेशात (Bangladesh) सरकारी नोकऱ्यांमधील राखीव कोट्याला विरोध करणाऱ्या विद्यार्थी गटांनी केलेल्या हिंसाचारात, किमान 300 लोक मारले गेले आणि हजारो जखमी झाले. देशातील सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षणाविरोधातील आंदोलन पंतप्रधानांच्या राजीनाम्यापर्यंत पोहोचले. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना (Sheikh Hasina) यांनी अखेर राजीनामा देऊन देश सोडला. आता लष्करप्रमुख जनरल वकार-उझ-झमान यांचे बांगलादेशवर नियंत्रण आहे. देशात अलोकशाही सरकार स्थापन करण्याची तयारी सुरू आहे. कालपासून बांगलादेशमध्ये घडत असलेल्या घटना पाहता, देशातील इतक्या वाईट स्थितीला जबाबदार कोण? असा प्रश्न निर्माण होत आहे.

आता अहवालांवर विश्वास ठेवला तर, यामागे पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयचा (ISI) कट असू शकतो किंवा या सत्तापालटामागे चीनचा हात असू शकतो, कारण भारत आणि बांगलादेश यांच्यातील चांगल्या मैत्रीमुळे चीनला बांगलादेशात हस्तक्षेप करणे शक्य नव्हते.

रविवारी देशभरात हिंसाचार भडकल्यानंतर आंदोलकांनी सोमवारी राजधानी ढाकाकडे मोर्चा काढण्याची योजना जाहीर केली. सैन्य आंदोलकांमध्ये सामील झाले आणि कमांड हाती घेतली. हसीना यांनी विरोध केला पण परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यावर त्यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आणि लष्कराच्या हेलिकॉप्टरने देश सोडला. यानंतर लष्कराने देशात अनिश्चित काळासाठी संचारबंदी लागू केली असून अंतरिम सरकार स्थापन करण्याची घोषणाही केली आहे.

पाकिस्तानच्या आयएसआयद्वारे कथितपणे समर्थित असलेली छात्र शिबीर, ही बंदी घातलेल्या जमात-ए-इस्लामीची विद्यार्थी शाखा देशात हिंसाचार भडकावण्यामागे आहे आणि बांगलादेशातील विद्यार्थ्यांच्या निषेधाचे समर्थन करत आहे, असे द इकॉनॉमिक टाइम्सने वृत्त दिले आहे. अनेक रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे की, पाकिस्तानी लष्कर आणि आयएसआयचे लक्ष्य पंतप्रधान शेख हसीना यांचे सरकार अस्थिर करणे आणि विरोध व हिंसाचाराच्या माध्यमातून विरोधी बीएनपीला पुन्हा सत्तेवर आणणे आहे.

भारताचे दोन शेजारी देश चीन आणि पाकिस्तान यांनी नेहमीच भारतात अशांतता पसरवण्याचा प्रयत्न केला आहे. याआधीही या दोन देशांनी भारताविरुद्ध कटकारस्थान रचले आहे, जेणेकरून ते आपला हस्तक्षेप वाढवू शकतील. 1971 मध्ये बांगलादेशला स्वातंत्र्य मिळाल्यापासून चीन आणि पाकिस्तान बांगलादेशात अशांतता निर्माण करण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहेत. (हेही वाचा: Bangladesh Political Crisis: बांगलादेशमध्ये 9,000 विद्यार्थ्यांसह 19,000 भारतीय नागरिक प्रभावित; एस जयशंकर यांची लोकसभेत माहिती)

बांगलादेशातील सध्याच्या या आंदोलनात कट्टरपंथी शक्ती आणि स्वयंसेवी संस्थांचाही सहभाग होता. आयएसआयने त्यांना आर्थिक मदत केली असण्याची शक्यता आहे. चीनलाही बांगलादेशात गुंतवणूक करायची होती, पण शेख हसीना यांच्या भारताशी असलेल्या चांगल्या मैत्रीमुळे चीन आपल्या हेतूत यशस्वी होऊ शकला नाही. आता सत्तापालटानंतर चीन बांगलादेशात आपला हस्तक्षेप वाढवू शकतो. त्यामुळे बांगलादेशातील या परिस्थितीला चीन-पाकिस्तान जबाबदार असल्याचे मानले जात आहे. आयएसआयला जमात-ए-इस्लामी बांगलादेश आणि विरोधी बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी (बीएनपी) यांनी पाठिंबा दिला होता, असाही अंदाज आहे. पाकिस्तान समर्थक समजल्या जाणाऱ्या बीएनपीला सत्तेत आणणे हे आयएसआयचे उद्दिष्ट आहे.