Bangladesh Crisis: बांगलादेशची धुरा सांभाळा; नोबेल पारितोषिक विजेते मुहम्मद यूनुस यांना आंदोलक विद्यार्थ्यांचे साकडे
पंतप्रधान शेख हसीना यांनी देशांतर्गत अस्थिरता आणि निदर्शने सुरु असताना राजधानी ढाका सोडले. त्यानंतर ही विनंती पुढे आली आहे. विद्यार्थी संघटनेचे प्रमुख नेते नाहिद इस्लाम, आसिफ महमूद आणि अबू बकर मुझुमदार यांनी मंगळवारी (8 ऑगस्ट) पहाटे एक व्हिडिओ जारी करत ही घोषणा केली.
आंदोलन, हिंसाचार आणि संघर्षाच्या पार्श्वभूमीवर बांगलादेश (Bangladesh Crisis) प्रचंड अस्थिर झाला आहे. ही अस्थिरता या देशाला कोठे घेऊन जाणार याबाबत जगभरातील अभ्यासक आणि विचारवंतांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. दरम्यान, देशाचे नेतृत्व करावे यासाठी नोबेल विजेते मुहम्मद यूनुस (Muhammad Yunus) यांना आंदोलक विद्यार्थ्यांनी विनंती केली आहे. पंतप्रधान शेख हसीना (Sheikh Hasina) यांनी देशांतर्गत अस्थिरता आणि निदर्शने सुरु असताना राजधानी ढाका सोडले. त्यानंतर ही विनंती पुढे आली आहे. विद्यार्थी संघटनेचे प्रमुख नेते नाहिद इस्लाम, आसिफ महमूद आणि अबू बकर मुझुमदार यांनी मंगळवारी (8 ऑगस्ट) पहाटे एक व्हिडिओ जारी करत ही घोषणा केली.
बांगलादेश स्थिरतेच्या प्रतिक्षेत
ढाका ट्रिब्यूनने दिलेल्या वृत्तानुसार, विद्यार्थी नेता नाहिद इस्लाम यांनी सोमवारी (7 ऑगस्ट) रात्री घोषणा रात्री घोषणा केली होती की, बांगलादेशमध्ये स्थिरता येण्यासाठी आणि अंतिम सरकार स्थापन करण्यासाठी आवश्यक कार्यक्रमाची रुपरेषा तयार केली जाईल. शेख हसीना यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिल्याचे वृत्त आल्यानंतर बांगलादेशमध्ये प्रचंड घडामोडी घडत आहेत. या देशाला स्थिरतेची आवश्यकता निर्माण झाली आहे. त्यासाठी एक सक्षम नेतृत्व आणि स्थिर सरकारची गरज तातडीने निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर नोबेल विजेते मुहम्मद यूनुस यांच्याकडे विद्यार्थी नेते आस लावून बसले आहेत. तर जगभरातील राजकीय अभ्यासकांच्या नजराही त्यांच्यावर खिळल्या आहेत. सांगितले जात आहे की, बांगलादेशमध्ये तातडीने सरकार स्थापन झाले नाही तर, देशाची सूत्रे लष्कर ताब्यात घेऊ शकते. (हेही वाचा, Bangladesh Crisis: भारतीय रेल्वे सेवेवरही झाला बांगलादेशातील हिंसाचाराचा परिणाम; कोलकाता-ढाका दरम्यानच्या Maitri Express सह अनेक गाड्या रद्द)
राष्ट्रपती मोहम्मद शहाबुद्दीन यांच्यासोबत सर्वसमावेशक बैठक
प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसर, राष्ट्रपती मोहम्मद शहाबुद्दीन यांनीही अंतिम सरकार स्थापन करण्यासाठी होकार दिला आहे. देशातील ढासळत्या कायदा आणि सुव्यवस्थेवर लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रपती भवन बंगभवन येथे एक बैठक पार पडली. ज्यामध्ये लष्कर, नौदल आणि हवाई दलाचे प्रमुख, राजकीय पक्षांचे नेते आणि नागरी समाजातील सदस्यांचा समावेश होता. बंगभवनचे सहाय्यक माध्यम सचिव मुहम्मद शिप्लू जमान यांनी स्वाक्षरी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, लष्कर, नौदल आणि हवाई दलाचे प्रमुख, विविध राजकीय पक्षांचे नेते आणि नागरी समाजाच्या सदस्यांशी सद्य परिस्थितीवर चर्चा केल्यानंतर बंगभवन येथे झालेल्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. देशातील हिंसाचार थांबविण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था पूर्ववत करण्यासाठी लष्कराला सांगण्यात आले आहे. तसेच, स्थिर सरकार स्थापनेसाठी तातडीने कार्यवाही करण्यावरही या बैठकीत एकमत झाले. (हेही वाचा, Bangladesh PM Sheikh Hasina Resigned: बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांचा राजीनामा, देशही सोडला; मीडियाचा सूत्रांच्या हवाल्याने दावा)
दरम्यान, बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचे (बीएनपी) सरचिटणीस मिर्झा फखरुल इस्लाम आलमगीर यांनी पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष तारिक रहमान लवकरच देशात परतणार असल्याची घोषणा केली आहे. सोमवारी रात्री साडेनऊ वाजता त्यांनी ही माहिती प्रसारमाध्यमांना दिली. बीएनपी नेते म्हणाले, "आपल्या सर्वांना माहित आहे की आमचे नेते, तारिक रहमान यांना खोट्या खटल्यांमुळे अन्यायकारकपणे परदेशात हद्दपार करण्यात आले आहे. त्यांनी या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा दिला आहे, आणि आम्ही त्यांना तात्काळ देशात परत आणण्यासाठी पावले उचलली आहेत. इंशाअल्लाह, आम्ही यशस्वी होऊ."