Ananya Birla Racism Cries: उद्योगपती कुमार बिर्ला यांची मुलगी अनन्या बिर्लाला अमेरिकेमध्ये वर्णद्वेषाचा अनुभव; Scopa Italian Roots रेस्टॉरंटमधून कुटुंबाला हाकलले
त्यात अमेरिकेसारख्या देशामध्ये अजूनही या घटना घडत आहे हे पाहून आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही.
जग 21 व्या शतकात पोहोचले, कितीही प्रगती केली तरी अनेक ठिकाणच्या वर्णभेदाची (Racism) उदाहरणे आपण आजही पाहत असतो. त्यात अमेरिकेसारख्या देशामध्ये अजूनही या घटना घडत आहे हे पाहून आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. आता देशातील प्रसिद्ध व्यापारी कुमार मंगलम बिर्ला (Kumar Mangalam Birla) यांची मुलगी अनन्या बिर्ला (Ananya Birla) हिने अमेरिकेच्या एका रेस्टॉरंटवर वर्णद्वेषाचा आरोप केला आहे. अनन्याने ट्विट करुन माहिती दिली आहे की, वॉशिंग्टनमधील स्कॉपा इटालियन रुट्स (Scopa Italian Roots) रेस्टॉरंटमधून तिला व तिच्या कुटुंबीयांना बाहेर काढले गेले. अनन्याने आपल्याला आलेला अनुभव ट्विटरवर शेअर केला आहे, ज्यानंतर अनेकांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
अनन्या बिर्लाने ट्विट करत म्हटले आहे, ‘स्कॉपा इटालियन रुट्स या रेस्टॉरंटने मला आणि माझ्या कुटुंबाला त्यांच्या आवारातून हाकलून दिले. हे अत्यंत वर्णद्वेषी व खेदजनक आहे. आपण आपल्या ग्राहकांशी योग्य प्रकारे वागले पाहिजे. हे योग्य नाही.’ दुसर्या ट्वीटमध्ये अनन्याने लिहिले की, ‘आम्हाला त्या रेस्टॉरंटमध्ये खाण्यासाठी 3 तास वाट पहावी लागली. शेफ अँटोनियो तुमचा वेटर जोशुआ सिल्व्हरमन (Joshua Silverman) माझ्या आईशी अत्यंत उद्धटपणे वागला. ज्याला वर्णद्वेश म्हटले जाईल. हे बरोबर नाही.’
कुमार मंगलम बिर्ला यांची पत्नी आणि अनन्या बिर्लाची आई नीरजा बिर्ला यांनीही ही घटना अत्यंत धक्कादायक असल्याचे ट्विट केले आहे. त्यांनी लिहिले की, ‘रेस्टॉरंटला कोणत्याही ग्राहकांशी अशाप्रकारे वागण्याचा हक्क नाही.’ नीरजा बिर्ला यांचा मुलगा आणि क्रिकेटपटू आर्यमान बिर्ला यांनीही ट्विट करुन हा अनुभव खूप वाईट असल्याचे सांगितले. त्यांनी लिहिले की, ‘जगात अजूनही वर्णद्वेष आहे आणि ही वस्तुस्थिती आहे.’ (हेही वाचा: 'नो शर्ट फ्री बियर' महिलांसाठी खास ऑफर, नवी मुंबई येथील एका बारची जाहीरात; कारवाईची मागणी)
दरम्यान, अनन्या ही आदित्य बिर्ला समूहाचे अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला आणि मेंटल हेल्थ वर्कर नीरजा बिर्ला यांची मुलगी आहे. अब्जाधीश वडिलांची मुलगी असण्याव्यतिरिक्त अनन्या एक अप्रतिम गायिका आहे. 2016 साली तिने आपले पहिले गाणे 'लिव्हिन द लाइफ' रेकॉर्ड केले. यानंतर युनिव्हर्सल म्युझिक इंडियासाठी गायिका म्हणून त्यांच्याशी करार केला. अलीकडेच तिचे 'डे गोज बाय' हे गाणेदेखील प्रसिद्ध झाले आहे, जे अनन्या आणि जमैकन-अमेरिकन गायकशॉन किंगस्टन यांनी गायले आहे. इतकेच नाही तर, अनन्याने बिझिनेस लाइनमध्येही पाय ठेवला आहे. ती ई-कॉमर्स कंपनी क्यूरोकार्टची संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.