रशियामध्ये 18-65 वयोगटातील पुरुषांना विकली जाणार नाहीत विमान तिकिटे; Vladimir Putin यांच्या इशाऱ्यानंतर निर्णय, जाणून घ्या कारण  

या दरम्यान हजारो लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत आणि लाखो लोक विस्थापित झाले आहेत,

Vladimir Putin | (Photo Credits: Facebook)

युक्रेन युद्धासाठी 3 लाख राखीव सैन्य पाठवल्यानंतर आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Russian President Vladimir Putin) यांनी अणुहल्ल्याचा इशारा दिल्यानंतर, रशियामध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. देशात मार्शल लॉ लागू होण्याची शक्यता असताना रशियन नागरिकांनी देश सोडून पळ काढण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे रशियाबाहेरील सर्व उड्डाणे पूर्णपणे बुक झाली आहे. अशात अहवालानुसार, रशियन एअरलाइन्सने 18 ते 65 वयोगटातील रशियन पुरुषांना तिकिटे देणे बंद केले असल्याचा दावा अनेक वृत्तवाहिन्या आणि पत्रकारांनी ट्विटरवर केला आहे.

रशियाच्या शेजारील देश आर्मेनिया, जॉर्जिया, अझरबैजान आणि कझाकस्तान या शहरांसाठी सर्व थेट विमानाची सर्व तिकिटे बुधवारी विकली गेली. हा तिकीट विक्रीचा हा डेटा रशियामधील अतिशय लोकप्रिय वेबसाइट Aviasales ने दर्शविला आहे. तुर्की एअरलाइन्सने त्यांच्या वेबसाइटवर जाहीर केले की, रशिया ते इस्तंबूलपर्यंतची त्यांची सर्व उड्डाणे शनिवारपर्यंत पूर्णपणे आरक्षित आहेत. पुतीन यांच्या टेलिव्हिजन संबोधनानंतर लवकरात लवकर देशातून बाहेर जाण्याची तयारी सुरु झाली.

पुतिन यांनी त्यांच्या भाषणात युक्रेनमधील आपल्या पराभवाची बातमी फेटाळून लावली. यासोबतच अमेरिकेसह नाटो देशांकडून रशियावर अणुहल्ल्याच्या शक्यतेच्या बदल्यात रशियाकडून अण्वस्त्र हल्ल्याचा इशाराही दिला. त्याचवेळी युक्रेनमधील युद्ध अधिक तीव्र करण्याची घोषणा करण्यात आली. फॉर्च्युनच्या अहवालानुसार, आता देशाबाहेर जाणाऱ्या लोकांसाठी नियम तयार करण्यात आले आहेत.

परदेशात जाऊ इच्छिणाऱ्या तरुणांना योग्य ते कारण देऊन, रशियाच्या संरक्षण मंत्रालयाची मंजुरी घ्यावी लागेल. तिथून हिरवा सिग्नल मिळाल्यानंतरच तरुणांना देशाबाहेर जाण्याची परवानगी दिली जाईल. पुतीन यांच्या टीव्ही संबोधनानंतर रशियाचे संरक्षण मंत्री सर्गेई शोईगु यांनी दावा केला होता की, देशातील 300,000 तरुणांना सेवेसाठी बोलावले जाईल. (हेही वाचा: रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या हत्येचा प्रयत्न; कारवर झाला आत्मघातकी हल्ला)

दरम्यान, युक्रेनमध्ये रशियाच्या 'स्पेशल मिलिटरी ऑपरेशन'ला सहा महिन्यांहून अधिक काळ लोटला आहे. या दरम्यान हजारो लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत आणि लाखो लोक विस्थापित झाले आहेत, परंतु पुतिन यांनी युद्ध थांबवण्यास नकार दिला आहे.