Afghanistan: अफगाणिस्तानात मशिदीवर मोठा हल्ला; शुक्रवारच्या नमाजनंतर झालेल्या बॉम्बस्फोटात 50 जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी

या हल्ल्यात डझनभर लोकांचा मृत्यू झाला आहे आणि मोठ्या संख्येने लोक जखमी झाले आहेत

Blast | Image used for representational purpose (Photo Credits: ANI)

अफगाणिस्तानात (Afghanistan) पुन्हा एकदा मशिदीला (Mosque) लक्ष्य करून त्यावर हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात तब्बल 50 लोकांचा मृत्यू झाला आहे आणि मोठ्या संख्येने लोक जखमी झाले आहेत. एएफपी या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, तालिबानच्या एका अधिकाऱ्याचे म्हणणे आहे, कुंदुज शहरात (Kunduz Province) शुक्रवारच्या नमाजानंतर शिया मशिदीवर हल्ला करण्यात आला आहे. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की जेव्हा ते प्रार्थना करत होते, तेव्हा त्यांनी स्फोटाचा आवाज ऐकला. अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही.

तालिबानचे मुख्य प्रवक्ते जबीहुल्ला मुहाजिद म्हणाले, ‘आज दुपारी कुंदुज प्रांताची राजधानी बांदरच्या खान आबाद जिल्ह्यात आमच्या शिया देशबांधवांच्या मशिदीत स्फोट झाला आहे, परिणामी आमचे अनेक नागरिक शहीद झाले आणि जखमी झाले. आहेत.’ सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोमध्ये रक्ताच्या थारोळ्यात अनेक मृतदेह जमिनीवर पडलेले दिसत आहेत. आम्ही हे फोटो आणि व्हिडिओची स्वतंत्रपणे पुष्टी करत नाही.

सूत्रांनी सांगितले की, आंतरराष्ट्रीय मदत गटाचा एक कर्मचारीही जखमींमध्ये आहे. या हल्ल्यामागे आयएसआयएस या दहशतवादी संघटनेचाही हात असू शकतो, असे मानले जाते. सुमारे पाच दिवसांपूर्वी काबूलमधील एका मशिदीच्या गेटवर जीवघेणा बॉम्ब स्फोट झाला होता. यामध्ये अनेक नागरिक मारले गेले. या हल्ल्याची जबाबदारी ISIS-K Attacks म्हणजेच इस्लामिक स्टेट-खोरासनने घेतली आहे. ही इस्लामिक स्टेट या जागतिक दहशतवादी संघटनेची अफगाणिस्तान शाखा आहे. तालिबानला लक्ष्य करून हा हल्ला करण्यात आला. प्रवक्ते जबीउल्लाह मुजाहिद याच्या आईच्या मृत्यूनंतर सुमारे एक आठवड्यानंतर येथे शोकसभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी लोकांनी जेवण केल्यावर मशिदीच्या गेटवर हल्ला झाला. (हेही वाचा: पाकिस्तानमध्ये सक्रीय आहेत तब्बल 12 दहशतवादी संघटना; अनेकांचे लक्ष्य आहे भारत, Report मधून धक्कादायक खुलासा)

या स्फोटानंतर काही तासांनी तालिबानने अफगाणिस्तानच्या राजधानीत इस्लामिक स्टेटच्या अड्ड्यावर हल्ला करून आपला बदला घेतला. त्या हल्ल्यात अनेक दहशतवादी ठार झाले. यापूर्वी 26 ऑगस्ट रोजी इस्लामिक स्टेट गटाने अजून एका भीषण हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती, ज्यात काबुल विमानतळाबाहेर 169 हून अधिक अफगाणी आणि 13 अमेरिकन सैनिक मारले गेले होते.