Blast In Pakistan: पाकिस्तानातील कराचीमध्ये भीषण स्फोट, 12 जणांचा मृत्यू, तर अनेक जण जखमी
पाकिस्तानातील (Pakistan) कराची (Karachi) शहरात शनिवारी भीषण स्फोट (Bomb Blast) झाला आहे. शहरातील शेरशाह पराचा चौक (Sher Shah Paracha Chowk) परिसरात हा स्फोट झाला असून यामध्ये 12 जणांचा मृत्यू झाला असून 12 जण गंभीर जखमी झाले आहेत. तर जखमींपैकी चार जणांची प्रकृती चिंताजनक आहे. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्राथमिक माहितीनुसार हा स्फोट परिसरातील एका नाल्यात झाला. या स्फोटामुळे तेथे असलेल्या एका खासगी बँकेच्या इमारतीचे मोठे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. नाल्यातील गॅस गळतीमुळे हा स्फोट झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. घटनेची माहिती मिळताच मदत आणि बचाव पथक घटनास्थळी पोहोचले आणि जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
हा स्फोट नाल्यातच झाल्याच्या वृत्ताला पोलिसांनी दुजोरा दिला आहे. अनेकांनी स्फोटाचे कारण बदली व इतर गोष्टी सांगितल्या. सध्या हा परिसर रिकामा करण्यात आला आहे. मात्र, खबरदारी म्हणून बॉम्बशोधक पथक घटनास्थळी पोहोचले आहे. पोलीस आणि रेंजर्सही तैनात करण्यात आले आहेत. सध्या परिसराची नाकाबंदी करण्यात आली आहे. पोलिसांनी शोधमोहीम पूर्ण केल्यानंतर बॉम्ब निकामी पथकाला स्फोटाच्या कारणाचा तपास सुरू करता येणार आहे. हेही वाचा 100 हून अधिक मृतदेहांवर बलात्कार, 2 जिवंत युवतींची हत्या; नराधमाला न्यायालयाने सुनावली 'ही' शिक्षा
सिंध रेंजर्सकडूनही एक निवेदन जारी करण्यात आले आहे. शेरशाह पराचा चौकाजवळ झालेल्या स्फोटात अनेक जण जखमी झाल्याचे या निवेदनात म्हटले आहे. शहरातील एसएचओ जफर अली शाह यांनी सांगितले की, हा स्फोट परिसरातील एका खाजगी बँकेच्या खाली असलेल्या नाल्यात झाला. नाला साफ करता यावा म्हणून बँकेला जागा रिकामी करण्याची नोटीस देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. स्फोटात बँकेच्या इमारतीचे आणि जवळच्या पेट्रोल पंपाचे नुकसान झाल्याचे शाह यांनी सांगितले.
इमारतीखालील नाल्यात वायू साचल्यामुळे हा स्फोट झाल्याचा संशय आहे, असे या अधिकाऱ्याने सांगितले. स्फोटाच्या फुटेजमध्ये एक खराब झालेली इमारत आणि ढिगारा जमिनीवर पडलेला दिसत आहे. स्फोटाच्या ठिकाणी नुकसान झालेली वाहनेही पाहायला मिळतात. लोक ढिगारा साफ करण्याचा प्रयत्न करताना दिसतात. ढिगाऱ्याखाली लोक गाडल्याचेही वृत्त आहे.